अनगर(सोलापूर): अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत एक अत्यंत अनपेक्षित आणि सर्वांनाच बुचकाळ्यात टाकणारी घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी उज्ज्वला थिटे यांनी अत्यंत नाट्यमयरित्या अर्ज दाखल केला होता. भाजप नेते राजन पाटील यांच्याविरोधात आघाडी उघडणाऱ्या उज्ज्वला थिटे यांना चक्क पोलीस बंदोबस्तात त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला होता.
मात्र, काल (18 नोव्हेंबर) छाननीत थिटे यांचा अर्ज बाद करण्यात आला. ज्यामुळे उज्ज्वला थिटेंना मोठा झटका बसला आहे. कारण आता त्या निवडणुकीच्या रिंगणातच बाहेर पडल्या आहेत.
उज्ज्वला थिटेंचा अर्ज का करण्यात आला बाद?
याबाबत माहिती देताना निवडणूक अधिकारी सचिन मुळीक असं सांगितलं की, थिटे यांच्या उमेदवारी अर्जावर सूचकाची स्वाक्षरी नसल्यामुळे त्यांचा अर्ज बाद करण्यात आला.
विशेष म्हणजे हे सर्व आक्षेप अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी घेतले होते.
हे ही वाचा>> नगरपंचायत बिनविरोध करण्यासाठी अनगरमध्ये दहशत? अर्ज भरु नये म्हणून पाठलाग; महिलेचे भाजप नेत्यावर आरोप
खरं तर अनगर नगर पंचायतीच्या तब्बल 17 सदस्यांची निवड ही बिनविरोध झाली होती. त्यामुळे नगराध्यक्ष पदाची निवडणूक देखील बिनविरोध होईल असाच सर्वांचा कयास होता.
पण ऐनवेळी उज्ज्वला थिटे यांनी अत्यंत नाट्यमय पद्धतीने उमेदवारी अर्ज भरल्यामुळे अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक ही अवघ्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली होती.
नगराध्यक्षपदासाठी केवळ तीनच अर्ज आले होते. त्यात माजी आमदार आणि भाजप नेते राजन पाटील यांनी सून प्राजक्ता पाटील यांचा तर सरस्वती शिंदे यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. तर तिसरा अर्ज राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्वला थिटे यांचा होता.
हे ही वाचा>> भाजप नेत्याला नडलेल्या उज्ज्वला थिटेंचा अर्जच झाला बाद, सूनबाई होणार बिनविरोध नगराध्यक्ष?
अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी अवघे 3 अर्ज येऊनही प्रशासनाकडून दुपारी साडेतीन वाजेपर्यंत छाननीचे काम चालूच होते. उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज राहणार की नाही, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. मात्र, छाननीत कागदपत्रे पूर्ण नसल्यामुळे तो अर्ज बाद ठरविण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मुळीक यांनी सांगितले.
दरम्यान, उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाल्यामुळे दुसरा अपक्ष उमेदवार माघार घेण्याची शक्यता आहे, त्यामुळे नगराध्यक्षपदी माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनेची बिनविरोध वर्णी लागणार असल्याचं आता उघड गुपित आहे.
अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी उज्ज्वला थिटेंच्या अर्जावर नेमके कोणते आक्षेप घेतलेले?
- थिटे यांच्या अर्जावर सूचकाची सही नाही.
- थिटे यांचा मतदार यादीतील प्रभाग व अनुक्रमांक चुकीचा आहे.
- थिटे यांनी त्यांच्या वयाचा पुरावा अर्जासोबत जोडलेला नाही.
- सूचकाचा मतदान यादीतील अनुक्रमांक चुकीचा आहे.
महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक अधिनियम 1966 आणि नगरपंचायत नगराध्यपक्षदी थेट निवडीच्या अधिनियमानुसार ह्याची चौकशी केली. त्यात थिटे यांचा अर्ज बाद असल्याचे आढळून आले आहे, असेही मुळीक यांनी सांगितले.
ADVERTISEMENT











