Washim News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अचानक मुसळधार पाऊस आल्यानं अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची अडचण झाली. वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातही चांगलाच पाऊस झाला. बोरवा गावातील शेतकरी गौरव पवार याच्या भुईमूगाच्या 25 क्विंटल शेंगा वादळी पावसात वाहून गेल्या आणि डोळ्यासमोर होत्याचं नव्हतं झालं. पण त्यांच्या या संकटाची दखल थेट दिल्लीतील केंद्रीय मंत्र्यांनी घेतली. गौरवने सांगितलं, “मला विश्वासच बसला नाही की माझ्यासारख्या छोट्या माणसाशी इतक्या मोठ्या व्यक्तीने संवाद साधला.”
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> छगन भुजबळ घेणार मंत्रिपदाची शपथ, कुणाला बसणार धक्का? राजकीय घडामोडींचा अर्थ काय?
काही दिवसांपूर्वी गौरव पवार आपलं भुईमुग मानोरा बाजार समितीमध्ये विक्रीसाठी घेऊन आला होता. पण अचानक आलेल्या वादळी पावसानं त्याचा सगळा माल पाण्यात वाहून गेला. अतिशय कष्टानं पिकवलेलं हे पीक वाचवण्यासाठी गौरवने शर्थीचे प्रयत्न केले, पण त्याच्या हाती काहीच लागलं नाही. यावेळी तिथं उपस्थित असलेल्या एका व्यक्तीनं गौरवचा हा संघर्ष व्हिडीओत कैद केला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.
हा व्हिडीओ केंद्रीय कृषि मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांच्यापर्यंतही पोहोचला. त्यांनी तातडीनं गौरवचा नंबर मिळवला आणि थेट त्याच्याशी फोनवर संवाद साधला. गौरवला भरपाईचं आश्वासन देऊन, उरलेला माल योग्य दरात खरेदी करण्याची व्यवस्थाही करणार असल्याचं सांगितलं. याशिवाय, चव्हाण यांनी गौरवच्या कुटुंबाची आणि घरच्या परिस्थितीचीही विचारपूस केली.
हे ही वाचा >> Mumbai COVID-19 Death: मुंबईत पुन्हा कोरोना आला.. दोघांचा मृत्यू? खरं काय ते समजून घ्या!
गौरवने ‘आजतक’शी बोलताना सांगितलं, “शिवराजसिंह चव्हाण यांच्या फोनने माझ्या मनातली आत्महत्येची भावना दूर झाली. त्यांच्या या पाठबळामुळे मला जगण्याची आशा मिळाली.” गौरवच्या गावातील लोकांनी म्हटलं की, दिल्लीतील मंत्र्यांनी दखल घेतली, पण महाराष्ट्र सरकार मात्र झोपलेली आहे का?
गौरवच्या बालपणीच्या मित्राने सांगितलं, “गौरवची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्याच्या वडिलांची प्रकृती ठीक नसल्यानं घरची आणि शेतीची जबाबदारी त्याच्यावर आहे. जर हा फोन आला नसता, तर गौरवने आत्महत्या केली असती.” त्याने राज्याच्या कृषिमंत्र्यांच्या निष्क्रियतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. दरम्यान, मानोरा बाजार समितीने गौरवला 20 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
ADVERTISEMENT
