नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (18 एप्रिल) रात्री 8.30 वाजता राष्ट्राला संबोधित करणार आहेत. 2026 मधील हे त्यांचे पहिलेच संबोधन असेल. महिला आरक्षण विधेयक लोकसभेत पारित न झाल्याने मोदी सरकारला मोठा धक्का बसला आहे. याच सुरू असलेल्या राजकीय गदारोळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी हे बोलणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांनुसार, मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान त्यांनी विरोधी पक्षांवर महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देण्याचा आणि महिलांच्या हक्कांच्या विरोधात काम करण्याचा आरोप केला. त्यामुळे आपल्या आजच्या संबोधनात तेच याच मुद्द्यावर बोलण्याची शक्यता अधिक असल्याचं मानलं जात आहे.
ADVERTISEMENT
मात्र, असं असलं तरी पंतप्रधान मोदींच्या मनात नेमकं काय चाललंय हे कुणालाही सांगता येणार नाही. कारण याआधी अनेकदा मोदींना आपल्या संबोधनातून देशवासियांना आश्चर्याचे धक्के दिले आहेत. त्यामुळे आज देखील ते असाच काही आश्चर्याचा धक्का देणार का? अशीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पाहा आतापर्यंत कितीदा राष्ट्राला संबोधित करताना PM मोदींनी दिलाय आश्चर्याचा धक्का
अचानक संबोधन करण्याची परंपरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा अचानक राष्ट्राला संबोधित केले आहे. या संबोधनांमधून अनेकदा आश्चर्यकारक निर्णय समोर आले आहेत, ज्यांचा अर्थव्यवस्थेपासून ते राष्ट्रीय सुरक्षेपर्यंत सर्व गोष्टींवर परिणाम झाला आहे.
हे ही वाचा>> पंतप्रधान मोदी आज रात्री देशवासियांशी बोलणार, राजकीय वर्तुळात चर्चांना तुफान उधाण.. मोदींच्या मनात नेमकं काय?
1. 2016: नोटाबंदीचा ऐतिहासिक निर्णय
8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान मोदींनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटाबंदीची घोषणा केली होती. काळा पैसा, बनावट चलन आणि भ्रष्टाचार रोखणे हा या निर्णयाचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले होते. हा देशातील सर्वात मोठ्या आर्थिक निर्णयांपैकी एक मानला जातो.
2. 2019: कलम 370 रद्द करण्यावरील संबोधन
8 ऑगस्ट 2019 रोजी, जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयानंतर पंतप्रधानांनी देशाला संबोधित केले होते. त्यांनी हे पाऊल राष्ट्रीय एकता आणि विकासासाठी आवश्यक असल्याचे सांगितलेले.
हे ही वाचा>> महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर, मोदी सरकारला मोठा धक्का
3. 2020: कोविड-19 आणि जनता कर्फ्यू
19 मार्च 2020 रोजी, कोविड-19 महामारीच्या काळात, पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते.
4. 2020: देशव्यापी लॉकडाउनची घोषणा
24 मार्च 2020 रोजी, पंतप्रधान मोदींनी देशव्यापी लॉकडाउनची घोषणा केली होती, जे महामारीशी लढण्यासाठी उचललेले सर्वात मोठे पाऊल होते.
आजचे संबोधन का महत्त्वाचे?
महिला आरक्षण विधेयकाच्या संदर्भातील राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर आजचे संबोधन होत असल्याने ते अत्यंत महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे. आता पंतप्रधान आपल्या संबोधनात महिला आरक्षण आणि विरोधी पक्षांशी असलेल्या संघर्षासंदर्भात कोणता मोठा संदेश किंवा निर्णय देतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
ADVERTISEMENT











