मुंबईच्या ऑल-बॉईज कॅम्पियन स्कूलमध्ये फुटबॉल खेळणारा एक बिनधास्त मुलगा त्याचं पूर्ण आयुष्य त्याच्या पद्धतीने जगू इच्छितो. त्याला वाटतं की, राजकीय कुटुंबात जन्म घेतल्याने आपण लवकरच राजकारणात येणार आहोत. म्हणून, त्याला त्याआधीच जीवनातील सर्व सुखांचा आनंद घ्यायचा होता. "एकदा मी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला की, मी हे सर्व करू शकणार नाही." असं म्हणत थेट व्यावसायिक शिक्षणासाठी त्याने लंडनला जाणं पसंत केलं...
ADVERTISEMENT
त्याने लंडनमधील रीजेंट विद्यापीठात प्रवेश मिळवला, परंतु त्याचे वडील अजित पवार हे त्याला मौजमजेसाठी पुरेसे पैसे पाठवायचे नाही. त्यामुळे लवकरच त्याचा हिरमोड झाला. त्याला लंडनमध्ये जगणं अजिबातच आरामदायी वाटलं नाही. ज्या तरुणाचं बालपण हे कायम पोलीस सुरक्षा, मंत्री आणि सत्तेच्या वर्तुळातच गेलं, त्याला लंडनचे "अनामिक" जीवन हे नकोसं वाटू लागलं
शेवटी दोनच वर्षे परदेशात राहून त्याने थेट मुंबई विद्यापीठ गाठलं. इथेच आपली पदवीही पूर्ण केली. याच दरम्यान, त्याचा ओढा राजकारणाकडे वाढू लागला. अनेक वर्ष त्याने त्याच्या आजोबा आणि वडिलांना सत्तेत पाहिलं होतं. त्यामुळे निवडणूक लढवण्याच्या सुप्त इच्छेला तो अजिबात आळा घालू शकला नाही. 2019 मध्ये, त्याने आजोबा शरद पवारांचं मत फारसं विचारात न घेता थेट निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला, परंतु इथेच त्याला पहिला झटका बसला.. कारण निवडणुकीच्या रिंगणात पराभवाची चव चाखणारा तो पहिला "पवार" ठरला.
हे ही वाचा>> Exclusive: रेवती Buildcon कंपनीसह पार्थ पवारांकडे 'एवढ्या' कंपन्यांचं संचालक पद!
बंडखोर वृत्तीने राजकीय कारकिर्द सुरू करणारा हा मुलगा प्रत्येक पावलावर त्याच्या पक्षाच्या आणि कुटुंबाच्या, विशेषतः त्याचे आजोबा शरद पवार यांच्या विचारसरणीला आव्हान देणारा ठरला. आतापर्यंतच्या राजकीय कारकीर्दत अनेकदा वादात सापडलेला हा तरूण नेता आता पुन्हा एकदा तो अडचणीत आला आहे. कारण त्याचं नाव थेट जमीन व्यवहाराशी संबंधित घोटाळ्यात पुढं आलं आहे.
आपण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांच्याबद्दल बोलत आहोत.
पवार कुटुंबातील पार्थ
तीन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार हे 11 भावंडांपैकी आठवे आहेत, त्यांना एकूण 7 भाऊ आणि 4 बहिणी आहेत. शरद पवारांव्यतिरिक्त त्यांच्या पिढीत कोणीही राजकारणात प्रवेश केला नव्हता. त्यांची एकुलती एक मुलगी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आहे. तर अजित पवार हे शरद पवार यांचे भाऊ अनंतराव पवार यांचे पुत्र आहेत. अजित पवार यांना दोन मुले आहेत. पार्थ, जे राजकारणात आहेत आणि जय, हे एक उद्योजक आहेत. रोहित पवार हे शरद पवार यांचे मोठे भाऊ आप्पासाहेब पवार यांचे नातू आहेत. याशिवाय, पवार कुटुंबातील इतर कोणीही राजकारणात सक्रियपणे सहभागी नाही. रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार हे शेती व्यवसायात गुंतलेले आहेत. तर कुटुंबातील इतर सदस्य विविध व्यवसायात गुंतलेले आहेत.
हे ही वाचा>> पार्थ पवारांना मोठा धक्का! अजितदादांनी थेट कॅमेऱ्यासमोरच सांगून टाकली 'ती' गोष्ट
पार्थ पवार यांनी मुंबईतील एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतले आहे. त्यांनी वाणिज्य पदवी मिळवली आहे. बिझनेस मॅनजमेंटचा अभ्यास करण्यासाठी ते लंडनलाही गेले होते. तिथून परतल्यानंतरच त्यांना राजकारणात रस निर्माण झाला.
राजकारणातील पहिलंच अस्थिर पाऊल
21 मार्च 1990 रोजी जन्मलेल्या पार्थ यांनी 2019 मध्ये पहिल्यांदा प्रसिद्धीच्या झोतात आले. जेव्हा ते पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छित होते. त्यांचे वडील अजित पवार यांचीही तीच इच्छा होती, परंतु त्यांचे आजोबा शरद पवार यांना ती गोष्ट पटली नव्हती. त्यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अविभाजित) एक नियम स्थापित केला होता की एका वेळी अनेक पवार एकाच निवडणुकीत उतरणार नाहीत. त्यांनी त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांना बारामती मतदारसंघातून उमेदवार म्हणून घोषित केले होते. ते स्वतः निवडणूक लढवू इच्छित होते. पण, त्यांना त्यांच्या नातवाच्या आग्रहापुढे झुकावे लागले आणि पार्थ यांना निवडणूक लढवण्याची परवानगी द्यावी लागली. शरद पवार यांना भीती होती की असे न केल्यास पक्षात फूट पडेल, जे नंतर प्रत्यक्षात घडलंच.
खरं तर, 2012 पर्यंत, पार्थ यांचे वडील अजित पवार राजकारणात अनेक वादात अडकले होते. त्यांच्यावर जलसंपदा विभागात भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. यामुळे त्यांची प्रतिमा गंभीरपणे खराब झाली होती. या आरोपांमुळे त्यांनी काही काळ उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही दिला होता. याच काळात, 7 एप्रिल 2013 रोजी, अजित पवार यांनी एक वादग्रस्त विधान केलं होतं. दुष्काळाने ग्रस्त असलेल्या महाराष्ट्रातील काही भागांविषयी बोलताना त्यांनी धरणातील पाणी आणि त्यासंबंधी वादग्रस्त विधान केलं होतं.
ज्यावरून मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. याबाबत एका मुलाखतीत पार्थ पवार यांनी म्हटलं होतं की, 'मी त्यावेळी राजकारणाला कंटाळलो होतो. चांगले काम करूनही माझ्या वडिलांवर एका घोटाळ्याबद्दल टीका होत होती ज्यामध्ये ते सहभागी नव्हते.' पार्थ पवार यांना असंही वाटत होतं की, त्यांच्या पीआर टीमनेही चांगले काम केले नाही आणि त्यामुळे त्यांच्या वडिलांची प्रतिमा डागाळली होती.
वडिलांची प्रतिमा सुधारण्यासाठी, पार्थ यांनी काही काळ वडिलांचे सोशल मीडियाचे काम देखील सांभाळले होते. वडिलांना त्यांचे काम आवडले आणि त्यांनी त्याला मावळ मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला. पण, शरद पवारांची या गोष्टीला फारशी पसंती नव्हती. त्यांनी तेव्हा असा सल्लाही दिला होता की, जर पार्थ यांना राजकारणात प्रवेश करायचा असेल तर त्यांनी प्रथम दोन किंवा तीन वर्षे तळागाळात कार्यकर्त्यांसोबत काम करावं. पण, अजित पवारांच्या मनात वेगळा विचार होता. त्यांना वाटलं की, जर पार्थ शरद पवारांच्या वारशाच्या आधारे निवडणूक जिंकू शकत असतील तर त्यांनी आताच का निवडणूक लढवू नये?
दुसरीकडे शरद पवार त्यांचं म्हणणं अजित पवार आणि पार्थ पवार या दोघांनाही पटवून देऊ शकले नाहीत. किंबहुना शरद पवार यांनी स्वत: निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आणि पार्थ यांना निवडणूक लढवण्याची परवानगी दिली. पण, ही पहिलीच निवडणूक पार्थ पवारांसाठी खूप कठीण ठरली. ते मावळ मतदारसंघात विजय मिळविण्यात सपशेल अपयशी ठरले आणि जवळजवळ 2 लाख मतांनी पराभूत झाले.
पवार कुटुंबातील एखाद्या सदस्याचा निवडणूक पराभव होण्याची ही पहिलीच वेळ होती. तेव्हापासून, पार्थ पवार यांनी निवडणुकीच्या राजकारणाऐवजी पक्षाच्या राजकारणाची जबाबदारी घेतली. विशेषतः पक्षाच्या युवा शाखेवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. आता, थेट निवडणूक लढवण्याऐवजी ते पडद्यामागे काम करतात.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यापासून ते त्यांच्या वडिलांसोबत म्हणजेच अजित पवारांसोबत आहेत. ते पक्षाच्या युवा शाखेला बळकटी देण्यासाठी काम करत आहेत.
PPF ची स्थापना
राजकारणाव्यतिरिक्त, पार्थ पवार हे समाजसेवेतही सक्रिय आहेत. त्यांनी पार्थ पवार फाउंडेशन (PPF) ही एक ना-नफा संस्था (NGO) स्थापन केली. ही संस्था महाराष्ट्र आणि भारतातील विविध प्रदेशांमध्ये शिक्षण, आरोग्य आणि उपजीविकेच्या क्षेत्रात काम करते. ही संस्था ग्रामीण विकास आणि गरजूंना मदत करण्यावर लक्ष केंद्रित करते.
पार्थ यांच्याकडे किती संपत्ती?
पवार कुटुंबातील वंशज असलेल्या पार्थ पवार यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. ही त्यांची स्वतःची मालमत्ता आहे. त्यांचे वडील अजित पवार किंवा आई सुनेत्रा पवार यांची नाही. त्यांची सध्याची संपत्ती स्पष्ट नाही, परंतु 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या सहा वर्षांपूर्वीच्या मालमत्तेची माहिती देण्यात आली आहे. पार्थ पवार यांनी त्यावेळी त्यांच्या मालमत्तेच्या कागदपत्रांमध्ये फक्त स्वतःच्या मालमत्तेची नोंद केली होती. त्यांनी त्यांचे वडील अजित पवार किंवा आई सुनेत्रा पवार यांच्या मालकीची कोणतीही मालमत्ता समाविष्ट केलेली नव्हती.
- पुण्यातील पॉश भोसलानगर भागातील ई-स्क्वेअरजवळील "जिजाई बंगला" त्याच्या मालकीचा आहे, ज्याची किंमत ₹13.16 कोटी आहे.
- त्याच्याकडे ₹3.69 कोटींची जंगम मालमत्ता आहे, ज्यामध्ये बँक बॅलन्स, वाहने इत्यादींचा समावेश आहे आणि ₹16.42 कोटींची स्थावर मालमत्ता आहे. पार्थ यांचा मुळशी तालुक्यातील घाटवाडे येथे एक फार्महाऊस देखील आहे.
- पार्थ पवारांनी त्यांच्यावर ₹9.36 कोटींचे कर्ज असल्याचे देखील जाहीर केले होते, त्यापैकी ₹7.13 कोटी त्यांची आई सुनेत्रा पवार यांचे तर ₹2.23 कोटी भाऊ जय पवार यांच्याकडून घेतले असल्याचे नमूद केलं होतं
- पार्थ पवार यांचे पुणे जिल्हा सहकारी बँक आणि बारामती सहकारी बँकेत बँक खाती आहेत. त्यांची बचत अनंत नागरी सहकारी बँकेत आहे.
पुण्यातील कोरेगाव जमिनीमुळे पार्थ पवार वादात
पार्थ पवार यांच्या व्यवसायाबद्दलचे वादग्रस्त खुलासे अलीकडेच समोर आले जेव्हा ते 'अमेडिया होल्डिंग्ज एलएलपी' या कंपनीशी देखील संबंधित असल्याचे उघड झाले. या कंपनीवर जमिनीच्या व्यवहारात अनियमिततेचा आरोप आहे. प्रकरण असे आहे की, कंपनीने पुण्यात सुमारे ₹300 कोटींना एक जमीन खरेदी केली, ज्याची किंमत कथितपणे ₹1800 कोटी होती. या व्यवहारासाठी योग्य स्टॅम्प ड्युटी भरली नसल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. एवढ्या मोठ्या जमिनीच्या खरेदीसाठी नियम धाब्यावर बसवून केवळ ₹500 स्टॅम्प ड्युटी भरल्याचा दावा करण्यात आला होता.
पार्थ पवार आणि वाद
पार्थ पवार हे काही वादांना अपरिचित नाहीत. गेल्या वर्षी पार्थ पवार यांचा एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते गँगस्टर गजानन मारणेसोबत दिसत होते. हा फोटो समोर आल्यानंतर अजित पवार देखील अस्वस्थ झाले होते. त्यांनी म्हटले होते की, हे चुकीचे आहे. पार्थने गुंडाला भेटायला नको होते.
२०२० मध्ये, तत्कालीन ठाकरे सरकारने सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील सीबीआय चौकशीला विरोध केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला परवानगी दिली तेव्हा पार्थ पवार यांनी ट्विट केले होते, "सत्यमेव जयते!" त्यावेळी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसकडेच गृहमंत्रालय होते. शरद पवार स्वतः सीबीआय चौकशीच्या मागणीला विरोध करत होते. त्यांनी पार्थ यांच्या सीबीआय चौकशीच्या मागणीला "बालिश" असं म्हटलं होतं.
तर कोविड-19 साथीच्या काळात, अयोध्येत राम मंदिराची पायाभरणी सुरू असताना, शरद पवार यांनी या समारंभाला विरोध केला होता, कारण त्यामुळे देशातील कोरोना साथीची समस्या सुटणार नाही. पण याच काळात पार्थ पवार यांनी पुन्हा एकदा पुढे येऊन राम मंदिराच्या बांधकामाचे कौतुक केलं होतं. ज्यामुळे पुन्हा एकदा पवार कुटुंबात राजकीय पातळीवर एकवाक्यता नसल्याचं दिसून आलं होतं.
ADVERTISEMENT











