मुंबई: लातूरमध्ये छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला भीषण मारहाण झाली. याचे व्हिडीओही समोर आले. अजितदादांच्या राष्ट्रवादी युवकचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण हे यात मारहाण करताना दिसले. यानंतर टीकेची झोड उठली. आणि अजितदादांनी तातडीने दखल घेतली. 'घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही, यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे.' असं म्हणत अजितदादांनी सूरज चव्हाणांची पदावरुन हकालपट्टी केली होती.
ADVERTISEMENT
असं असताना आता अचानक पुन्हा सूरज चव्हाणांना मोठं पद देण्यात आलं. याचं पत्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसह अजितदादांच्या नेत्यांनी सूरज चव्हाण यांना दिलं आहे. पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन वर्तन करणाऱ्या सूरज चव्हाणांना पक्षाच्या वाढीसाठी पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हे ही वाचा>> "राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी एकत्र येण्याचा निर्णय आता...", शरद पवार नेमकं काय म्हणाले?
आता हे एकूण प्रकरणच रंगलं. काहीजण अजितदादांवर आरोप करत आहेत. तर काही जण अजितदादांच्या पक्षात दोन गट पडले आहेत असं म्हणत आहेत. तर काही जणांना अजितदादांची प्रतिमा खराब करण्याचा हा डाव वाटतो आहे.
‘शब्दाला पक्का’ या अजितदादांच्या प्रतिमेला धक्का', रोहित पवारांची बोचरी टीका
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार रोहित पवारांनी यावर एक पोस्ट केली आहे. 'लातूरमध्ये केलेल्या गुंडगिरीप्रकरणी पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेण्याचा अजितदादांचा निर्णय योग्यच होता, परंतु महिनाभराच्या आतच त्या वादग्रस्त पदाधिकाऱ्याचे प्रमोशन केले जात असेल तर याला काय म्हणायचं?'
'अजितदादांच्या पक्षात दोन गट असून दुसरा भाजपप्रेमी गट जाणूनबुजून अजितदादांची प्रतिमा खराब करण्यासाठी कार्यरत असतो. ‘शब्दाला पक्का’ या अजितदादांच्या प्रतिमेला धक्का देण्यासाठी कालची वादग्रस्त नियुक्ती केली गेली अशी चर्चा आहे. मारहाण करताना फ्रॅक्चर झालेल्या हातावरील प्लास्टरचा पट्टा निघण्याच्या आतच प्रमोशन केलं, नियुक्ती करणाऱ्याच्या हिमतीला दाद द्यावी लागेल.शेवटी, ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’!'
अंजली दमानियांनी उठवली टीकेची झोड
हे झालं रोहित पवारांचं मत. या नियुक्तीवर अंजली दमानियांनी देखील आक्षेप व्यक्त केला आहे. त्या म्हणतात, युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून आता थेट पक्षाचे सरचिटणीस पद?
हे ही वाचा>> भाजप आमदारांची 'ती' ऑडिओ क्लिप व्हायरल! अश्लील भाषा वापरून अधिकाऱ्याला केली शिविगाळ?
छावा संघटनेच्या नाकावर टिच्चून राष्ट्रवादी पक्षाने सूरज चव्हाण यांना प्रमोशन दिले. आता महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीस पदी सूरज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली.
हेच का महाराष्ट्राचे ‘Good Governance?’
मारामाऱ्या करणाऱ्या माणसाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचे सरचिटणीस बनवतात? छान!
पण …… कमालीची बाब म्हणजे, अगदी २ आठवड्या पूर्वी, मी केलेल्या मानहानीच्या दाव्यात, ह्याच राष्ट्रवादी पक्षाने, सूरज चव्हाण हे आमचे पदाधिकारी नाहीत, ते कार्यालय येत नाहीत असे कोर्टाला लिहून दिले आहे. (फोटो खाली जोडला आहे) मग असे अचानक काय झाले?
काही महिन्यांपूर्वी ह्याच पक्षाने ‘जन सन्मान यात्रा ‘ काढली होती.
दिसला का ह्यांचा जन सन्मान?
दमानियांनी याआधीही सूरज चव्हाणांवर हल्लाबोल केला आहे.
यात महत्त्वाची गोष्ट पुढे आहे. दोन महत्त्वाच्या नियुक्त्या झाल्या. यात पहिली नवाब मलिकांची मुंबई मनपाच्या तयारीसाठी आणि दुसरी सूरज चव्हाणांची. एकाच जागी दोघांना नियुक्तिपत्रं देण्यात आली. मात्र एका फोटोत दादा दिसतात तर दुसऱ्या म्हणजे सूरज चव्हाणांना नियुक्ती देताना दादा दिसत नाहीत.
यावर प्रशांत भोसले यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलाय. आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये ते म्हणतात, 'मुंबई मनपा निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांची नियुक्ती झाली सोबतच सूरज चव्हाण यांना पण सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली पण दोन्ही वेळी अजितदादा हे त्या ठिकाणी उपस्थित असावेत.'
'सर्व नेते त्याच क्रमाने उभे आहेत जसं पहिल्या फोटोमध्ये आहेत दुसऱ्या फोटोत फक्त अजितदादा नाहीत ते बाजूला गेले असावेत. यात दोन शक्यता आहेत एक तर दादांना छावा संघटना यांच्या विरोधात जायचे नाही किंवा त्यांच्या पक्षातील समस्त ओबीसी नेते हे दादांना त्यांच्या पक्षात एकटे पाडत आहेत, असं भोसलेंनी म्हटलं आहे.'
आता सूरज चव्हाणांच्या या प्रमोशननंतर अजितदादांवर टीका होऊ लागली आहे. ज्यांना मारहाण झाली ते छावाचे विजयकुमार घाडगेंनी दादांना हे परवडणार नसल्याचं म्हटलं आहे. तटकरेंनी सत्तेचा माज दाखवला आहे असं घाडगे म्हणतात. सूरज चव्हाणांकडे या लोकांची बरीच गुपितं असावीत असा संशय देखील घाडगेंनी व्यक्त केला आहे. आता पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही, असं दादा म्हणाले होते, मात्र आता हे वर्तन कोणत्या स्थितीत स्वीकारले हा प्रश्न खरोखर अनुत्तरीत आहे.
ADVERTISEMENT
