चाळ नावाची 'भिकार' वस्ती, मराठी सिनेमा चाळ संस्कृतीबद्दलचा साचेबद्धपणा कधी सोडणार?
प्रातिनिधीक छायाचित्र

चाळ नावाची 'भिकार' वस्ती, मराठी सिनेमा चाळ संस्कृतीबद्दलचा साचेबद्धपणा कधी सोडणार?

महेश मांजरेकरांच्या कोन नाय कोन्चा चित्रपटातील त्या दृष्यांवरुन नवीन वादंग

मुंबईत लहानाचे मोठे झालेल्या मराठी व्यक्तींना चाळ संस्कृतीचं मोठं अप्रूप असतं. लालबाग, दादर, परळ, गिरगाव, सातरस्ता अशा अनेक मराठीबहुल भागांमध्ये पूर्वीच्या काळात चाळ संस्कृती चांगली प्रसिद्ध होती किंबहुना ती आजही आहे. मुंबई हे जेव्हा गिरण्यांचं शहर म्हणून ओळखलं जायचं त्यावेळपासून इथल्या चाळींनी अनेक स्थित्यंतर पाहिली आहेत. काळाच्या ओघात चाळी पडून त्या जागेवर गगनचुंबी टॉवर तयार झाले. चाळीत राहणारा मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेला.

या राजकारणात जरी पडायचं नाही असं ठरवलं तरीही चाळ संस्कृतीचं अप्रुप तयार करण्यात मराठी सिनेमा आणि नाट्यसृष्टीने मोठी भूमिका बजावली आहे. कोणताही सिनेमा घ्या चाळ म्हणलं की सतत एकमेकांशी भांडणारे शेजारी, नेहमी कोणत्या न कोणत्या उत्सवात किंवा मग रस्त्यावर राडा घालणारी तरुण पोरं आणि चाळीतल्या मुलीचं प्रेमप्रकरण हेच चित्र आतापर्यंत मराठी सिनेमाने जगाला दाखवलं. महेश मांजरेकर यांच्या लालबाग परळ आणि आगामी नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा या सिनेमामुळे पुन्हा एकदा चाळ संस्कृतीचा विषय चर्चेत आला आहे.

लालबाग परळ या सिनेमाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. परंतू अनेकांनी या चित्रपटात महेश मांजरेकर यांनी चाळ संस्कृतीच्या उभ्या केलेल्या चित्रावर आक्षेप घेतला होता. चाळ म्हणलं की अठराविश्व दारिद्र्य दाखवलंच पाहिजे का?, चाळीत राहणारी मुलं नेहमी मारामारी आणि फक्त उत्सवांसाठी वर्गणीच मागत फिरत असतात का? मुंबईतल्या गिरण्यांना टाळी लावलेली असताना सर्वच महिलांनी देहविक्रीचा मार्ग स्विकारला असेल का असे अनेक आक्षेपही या सिनेमावर घेण्यात आले. आगामी येऊ घातलेल्या कोन नाय कोन्चा या चित्रपटाच्या ट्रेलरमधूनही महेश मांजरेकर असचं काहीसं चित्र उभं करुन दाखवत असल्याचं कळतंय.

ही बाब फक्त मराठी सिनेमाच नाही तर थोड्या फार प्रमाणात मालिका आणि नाटकांनाही लागू होते. परंतू प्रत्यक्षात चाळीत राहणाऱ्या लोकांची परिस्थिती असते तरी कशी? आजही चाळीत फक्त छोटी-मोठी कामं करणारी, उत्सवासाठी वर्गण्या काढणारी मुलंच राहतात का? तर नाही...चाळीचं चित्र हे बऱ्याचप्रमाणात बदललं आहे पण बदलली नाहीये ती मराठी सिने आणि नाट्यसृष्टीची मानसिकता.

मुंबईच्या रुईया महाविद्यालयात लेक्चरर म्हणून काम करणारा आणि मुंबई विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात पी.एच.डी. चा अभ्यास करणाऱ्या संदेश सामंत या तरुणाने काही वर्षांपूर्वी मुंबईतल्या चाळ संस्कृतीबद्दल निर्माण करण्यात आलेल्या चित्राची पोलखोल करणारी एक पोस्ट फेसबूकवर लिहीली होती. आमच्या वाचकांसाठी तो पोस्ट जशीच्या तशी देत आहोत.

चाळ नावाची भिकार वस्ती!

समस्त उभ्या आडव्या महाराष्ट्राप्रमाणेच आमच्या घरीही तुला पाहते रे ही मालिका पाहिली जाते. सध्या लग्नाची चर्चा असली तरी ती मला इथे करावीशी वाटत नाही. इथे विषय वेगळा आहे. तो म्हणजे चाळीचा. त्या मालिकेत नायिकेचं कुटुंब बेडेकर सदन नावाच्या चाळीत राहत असतं. आणि म्हणूनच ते पर्यायाने अत्यंत गरीबही असतं. ज्या व्यक्ती ही मालिका पाहतात त्यांना या चाळीतली पात्रही नक्कीच माहीत असतील.

हाच खरा विषय आहे.

गेली २६ वर्ष मी गिरगावात राहतोय. त्यातील बहुतांश काळ आम्ही चाळीत घालवलाय. माझे आई बाबा तर त्यांच्या जन्मापासून आजतागायत चाळीत राहतायत. त्यामुळे चाळ या विषयाशी माझा फार चांगला संबंध राहिलाय. म्हणूनच मराठी सिने नाट्य सृष्टीने चाळींवर आणि पर्यायाने मराठी माणसावर अतोनात अन्याय केलाय, असं मला राहून राहून वाटतं.

आम्ही चाळीत राहत असलो तरी मला त्याचा अभिमान नाही. किंवा चाळीचं उदात्तीकरण करणं मला मुळीच आवडत नाही. चाळीचे अनेक फायदे असले तरी चाळ ही काही आधुनिक युगात राहण्याची जागा नाही असं बहुसंख्य लोकांना वाटतं. त्यावर माझा आक्षेपही नाही. अनेकांनी उपनगरांत आपला मुक्काम हलवला. शेवटी मोठं घर आणि स्वतःची 'स्पेस' ही आजकाल प्रत्येकालाच हवी असते. आर्थिक आणि सामाजिक महात्त्वाकांक्षांसोबत घराचं क्षेत्रफळ वाढणं हे क्रमप्राप्त आहे. आम्ही पर्याय असूनही चाळीत राहण्याचा निर्णय घेतला, ही बाब वेगळी. त्यामुळे चाळीविषयी मला फार गर्व नसला तरी मराठी माध्यमांत दिसणारी चाळ मात्र मला अत्यंत खोटी आणि दयनीय वाटते, ही माझी तक्रार आहे.

पु ल देशपांडेंनी लिहिलेली बटाट्याची चाळ आपल्यातील वाचन करणाऱ्या बहुतांश लोकांना माहीत असते. पण, समस्या अशी आहे की आपल्याला केवळ तीच चाळ माहीत असते. चाळ म्हणजे लहान घरं, चाळ म्हणजे भांडके शेजारी, चाळ म्हणजे अठरा विश्व पसरलेलं दारिद्य्र, चाळ म्हणजे चहाड्या करणाऱ्या बायका आणि त्यावर कळस म्हणजे चाळ म्हणजे सकाळी संडासच्या बाहेर रांगा लावून उभी असणारी माणसं.

मराठी माणूस २१व्या शतकात पोहोचलेला असला तरी मराठी मनोरंजन क्षेत्रात असलेली चाळ मात्र कालचक्रात अडकून राहिलेली दिसते. चाळ ही जणू गरिबीचं आणि मराठी माणसाच्या बिकट अवस्थेचं प्रतीक ठरते. चाळीत असलेली माणसं ही अगदी फणसछाप (बाहेरून भांडखोर, पण आतून प्रेमळ) असतात वगैरे वगैरे वर्णनं अक्षरशः वीट आणतात. मोठ्या आणि छोट्या पडद्यावर चाळ दाखवणाऱ्या व्यक्ती कधी शेवटच्या चाळीत राहिल्या, हा प्रश्न मनाला शिवून जातो.

गिरगावात वास्तव्य असल्याने मी अनेक चाळींमध्ये नेहमी जात असतो. शिवाय दादर परेल भागात जाणं येणं असल्यानेही तिथल्याही चाळी पाहत असतो. मालाड गोरेगाव भागात असलेल्या काही चाळीही परिचयाच्या आहेत. आणि त्यामुळेच चाळ ही सिनेमापेक्षा अतिशय वेगळी आहे, असं मला नेहमी वाटतं.

आजकाल तुम्ही कोणत्याही चाळीत गेलात तरी बहुतांश घरांमध्ये तुम्हाला एअर कंडिशनर दिसतो. आमच्याकडेही अनेकांकडे तो आहे. प्रत्येक घरात निदान एक तरी एलईडी टेलिव्हिजन आहे. फ्रीज आहे. मिक्सर आहे. म्हणाल ते गॅजेट आहे. पण टीव्हीवर येणाऱ्या चाळीत मात्र या गोष्टी अगदी अभावानेही दिसत नाहीत. दिसतो काय तर रेडियो. आमच्याकडे प्रत्यक्षात किती जण आकाशवाणी ऐकतात, अशी शंका येते.

आमचे बाबा लहान असताना म्हणजे ५० किंवा ६० च्या दशकांमध्ये म्हणे चाळीत मज्जा असायची. पुरुष मैदानात एकत्र झोपत असत. तर महिला घरात. कारण काय, तर घरात माणसं खूप असायची. आले गेलेलं प्रत्येक जण चाळीत राहायचं. मला त्यात मज्जा वाटत नाही. मात्र आजच्या चाळीत ही परिस्थिती कुठेच दिसत नाही. अनेक घरं तर बंद आहेत. सार्वजनिक नळसुद्धा चाळींतून हद्दपार झालेत. प्रत्येक घरात पाणी येतं, टाकी आहे, पंप आहे, मुबलक पाणी आहे. पण, नळावरची भांडणं मात्र आजही लोकांना चाळींची आठवण करून देतात, ही विचित्र बाब आहे.

चाळीत असणाऱ्या व्यक्ती चट्टेरी पायजमे घालून फिरताना मी केवळ टिव्हीत पाहिल्यायत. नाही म्हणायला आम्ही लहान असताना एक दोन अतिशय वृद्ध व्यक्ती होत्या तश्या, पण आजकाल मात्र सर्वजण शर्ट पॅन्ट घालूनच फिरतात.

सर्वात महत्त्वाचा मुद्दा आर्थिक स्थितीचा. तुम्ही संजय नार्वेकरचा 'अगं बाई अरेच्चा!' बघा किंवा अंकुश चौधरीचा 'डबल सीट' बघा की अगदी अवधूत गुप्तेने काढलेला 'मोरया' बघा... चाळीतली मुलं ही अत्यंत दिशाहीन किंवा तृतीय श्रेणी काम करून पोट भरणारी दिसतात. प्रत्यक्षात मात्र मला चाळीत राहून किंवा आजही चाळीत राहणारे सीए, इंजिनियर, डॉक्टर, व्यावसायिक आणि इतर अनेक क्षेत्रातल्या व्यक्ती चांगल्याच ठाऊक आहेत. चाळींमध्ये टॅक्स पेयर जनताही मोठ्या प्रमाणात राहते, ही बाब चाळीत राहूनच मोठे झालेले निर्माते आणि दिग्दर्शक विसरतात, याची खंत वाटते.

चाळींत भांडणं होत नाहीत का? तर नक्कीच होतात. कोणत्याही समूह वस्तीत भांडणं होतात. पण, पडद्यावर दाखवलेल्या भांडणांसारखी मात्र मी क्वचितच पाहिलीयेत. आजकाल गाडी पार्किंगच्या जागेवरून होणारी भांडणं मात्र वाढलीयेत हे मी ठामपणे सांगू शकतो. कोणत्याही चाळीत गेलात तरी खोऱ्याने चारचाकी गाड्या दिसतात. प्रत्येकाच्या घरी चांगलं फर्निचर दिसतं. माणसं ब्रँडेड कपडे घालून वावरताना दिसतात. इतकंच काय, तर आजकाल अनेकांच्या घरांमध्ये कमोड संडास पण असतात... ते ही विथ जेट स्प्रे. गिरणगावात झालेल्या संपांनी लालबाग उद्धवस्त केलं. पण आज त्याच लालबागच्या रस्त्यांवरून जाताना चाळीतल्या बहुतांश घराबाहेर एसीचं मशीन दिसतं. तिथेच मोठं होऊन आज अंधेरी परिसरात राहिला गेलेल्यांना ते दिसत नाही हे विशेष.

त्यामुळे मराठी मनोरंजन सृष्टीने बिंबिसार नगरच्या म्हाडाच्या टॉवर्समधून किंवा शिवाजी पार्कच्या हेरिटेज वस्तीच्या बाहेर जाऊन २१व्या शतकांतल्या चाळी पाहूनच मग चाळीचं चित्रण मांडावं, असं वाटतं. चाळ ही आर्थिक उदारीकरणाची आणि जागतिकीकरणाची लाभार्थी आहे. चाळींवर आणि चाळीतल्या माणसांवर त्याचे परिणाम झालेत. ढाचा सोडला तर चाळीचा आत्मा बदलाय. अनेक ठिकाणी विकासकामांत तो ढाचाही हद्दपार झालाय. मध्यमवर्गीय माणसांच्या वाढत्या महत्त्वाकांक्षांप्रमाणे चाळींचे टॉवर्सही गगनाला भिडू लागलेत.

पण एके काळी 'चाळ नावाची वाचाळ वस्ती' म्हणवली गेलेली ही लोकवस्ती पुढे मराठी मनोरंजन सृष्टीनेच 'भिकार आणि बकाल वस्ती' म्हणून (कु)प्रसिद्ध केली, हे शल्य न पचणारं आहे.

- संदेश स. सामंत

कोन नाय कोन्चा सिनेमाबाबत जो काही निर्णय घेतला जाईल तो वेगळा मुद्दा असेल. मुंबईतल्या चाळींनी आतापर्यंत अनेक स्थित्यंतर पाहिली आहेत. काही चाळी काळाच्या ओघात पडल्या तर काही अजुनही आपलं अस्तित्व टिकवून आहेत. परंतू मोठ्या पडद्यावर या चाळ संस्कृतीचं चित्रीकरण करताना दुर्दैवाने त्याची काळी बाजूच अधिक ग्लोरिफाय करुन दाखवली गेली हे सत्य नाकारुन चालता येणार नाही.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in