Maharashtra@61: मराठी तरूणाईच घडवेल नवा महाराष्ट्र
महाराष्ट्राचा आणि मराठीपणाचा अभिमान बाळगणाऱ्या सगळ्यांना शुभेच्छा. 1 मे 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. माझा जन्म 1959 मधला, त्यामुळे आमच्या पिढीचा प्रवास हा महाराष्ट्रासोबतच झाला असं म्हणायला हरकत नाही. मी कवितांच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यांमध्ये फिरलो आहे. तो महाराष्ट्र आम्ही अनुभवला आहे, बघितला आहे. महाराष्ट्राबाबत पुष्कळ वाचनही करायला मिळालं. सजग पद्धतीने सगळ्या क्षेत्रांकडे बघणं आणि […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्राचा आणि मराठीपणाचा अभिमान बाळगणाऱ्या सगळ्यांना शुभेच्छा. 1 मे 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. माझा जन्म 1959 मधला, त्यामुळे आमच्या पिढीचा प्रवास हा महाराष्ट्रासोबतच झाला असं म्हणायला हरकत नाही. मी कवितांच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यांमध्ये फिरलो आहे. तो महाराष्ट्र आम्ही अनुभवला आहे, बघितला आहे. महाराष्ट्राबाबत पुष्कळ वाचनही करायला मिळालं. सजग पद्धतीने सगळ्या क्षेत्रांकडे बघणं आणि अंतर्मुख होऊन आपणच आपली चिकित्सा करणं आपण आज कुठे आहोत, काल कुठे होतो आणि आपल्याला कुठे जायचं आहे हे शोधणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यानिमित्ताने माझे काही विचार मांडतो आहे.
Maharashtra@61 : जाणून घ्या काय म्हणत आहेत ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर ?
महाराष्ट्राने राजकारणात स्वाभिमान दाखवला आहे. मात्र राष्ट्रीय राजकारणात अगदी यशवंतराव चव्हाण यांच्यापासून जे दुय्यम स्थान महाराष्ट्राने पत्करलं ते पत्करलं. ते का घडलं ते ठाऊक नाही. पण आपल्यासारख्या माणसाला हे वाटतं की सर्व प्रशासकीय जाण असलेला आणि महाराष्ट्राची नस ठाऊक असलेला मराठी माणूस महाराष्ट्राचा पंतप्रधान का झाला नाही? हा प्रश्न पडतोच. 61 वर्षांमध्ये ही गोष्ट घडली नाही. ज्यांच्याबाबतीत ही शक्यता होती त्यांनी त्यांच्या अनुयायांनी याबाबत अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे असं मला वाटतं.
महाराष्ट्रात सहकार चळवळीला प्राधान्य देण्यात आलं ते रास्तच होतं. पण पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखान्यांचं जाळं उभं करून जी भरभराट साधली गेली. मात्र विदर्भात संत्र्यांच्या किंवा कापसाच्या उत्पादनाच्या आधारावर तसे उद्योग उभे राहिले नाहीत. विकासाचा अनुषेश वाढत गेला. राज्यात कुठेतरी असमतोल निर्माण झाला. अनेक तज्ज्ञ लोक असं म्हणतात की नंदुरबार, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ यासारखे जे जिल्हे आहेत तिथे नक्षलवादी वातावरण पसरलं ते कशामुळे पसरलं त्याचाही विचार व्हायला हवा. त्यांच्यावर कारवाई तर केलीच पाहिजे. निरपराध लोकांना त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागतं, त्यांच्या हत्या होतात, त्याला विरोध आहेच पण या चळवळी निर्माण का झाल्या याचा विचार होणं गरजेचं आहे.