पैसा-पाणी: अमेरिका आणि भारतात ट्रेड डील होणार का?
भारत आणि अमेरिकेमध्ये ट्रेड डील होणार की नाही याबाबत आता सध्या वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत. याचबाबत आपण जाणून घेऊया पैसा-पाणी या विशेष ब्लॉगमधून.
ADVERTISEMENT

भारत आणि अमेरिकेमधील संबंधात जो तणाव वाढला होता तो आता हळूहळू कमी होऊ लागला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प महिनाभरापूर्वीपर्यंत भारताला Dead Economy म्हणत होते, आता ते 'मोदी माझे मित्र आहेत, Deal मध्ये कोणतीही अडचण येणार नाही.' असे पोस्ट करत आहेत. भारताचे वाणिज्य मंत्री पियुष गोयल देखील म्हणत आहेत की, नोव्हेंबरपर्यंत डील होऊ शकते. अमेरिकेची भूमिका का बदलत आहे हे आपण पैसा-पाणी या विशेष सदरातून जाणून घेऊया.
भारताची कूटनिती
अमेरिकेने भारतातून येणाऱ्या वस्तूंवर 50% कर लादला आहे. 25% कर Reciprocal आहे, म्हणजेच हा कर भारताच्या जास्त कर आकारणीच्या बदल्यात आहे, परंतु 25% अतिरिक्त कर रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे आहे. पण भारत याच्या दबावाखाली आला नाही, याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीन आणि रशियाच्या राष्ट्रपतींना भेटून अमेरिकेला योग्य संदेश दिला. ही केवळ राजनैतिक बाब नाही, या टॅरिफ हे आता अमेरिकेवरच उलटू लागलं आहे.
अमेरिकेत महागाई दर वाढला
गेल्या आठवड्यात दोन आकडेवारी जाहीर झाल्या. अमेरिकेत महागाई दर 2.9% पर्यंत वाढला आहे. कंपन्यांनी इतर देशांमधून येणाऱ्या वस्तूंच्या जास्त किंमती ग्राहकांवर लादण्यास सुरुवात केली आहे. कॉफीपासून ते गाड्यांपर्यंत सर्व गोष्टींच्या किंमती वाढत आहेत. दुसरीकडे, बेरोजगारी वाढत आहे आणि नवीन नोकऱ्या निर्माण होत नाहीत. ऑगस्टमध्ये केवळ 22,000 नोकऱ्या निर्माण झाल्या. ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर, पूर्वीपेक्षा कमी नवीन नोकऱ्या निर्माण होत आहेत. टॅरिफ लागू झाल्यापासून कंपन्यांनी नोकऱ्या देण्यास टाळाटाळ केली आहे.
वाढती महागाई आणि बेरोजगारीमुळे फेड रिझर्व्ह देखील अडचणीत सापडला आहे. वाढत्या बेरोजगारीमुळे फेड रिझर्व्ह व्याजदरात कपात करू इच्छित आहे, परंतु वाढत्या महागाईमुळे त्यांना त्याबद्दल विचार करावा लागेल. या कपातीमुळे महागाई वाढू शकते. या आठवड्यात फेड रिझर्व्हच्या बैठकीत व्याजदरांबाबत निर्णय घेतला जाईल. व्याजदरात कपात ही भारतीय शेअर बाजारासाठी चांगली बातमी असेल. तेथील व्याजदरात कपात केल्यानंतर, परदेशी गुंतवणूकदार सामान्यतः भारतासारख्या बाजारपेठांकडे वळतात कारण परतावा चांगला असतो.










