‘नाना पटोलेंनी राजीनामा द्यायला नको होता’, अजित पवारांनी सांगितली चूक
नाना पटोले यांनी राजीनामा द्यायला नको होता. त्यांनी राजीनामा देण्यापूर्वी त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा केली नाही, असं विधान अजित पवार यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT

Ajit Pawar On Supreme Court Judgement on maharashtra political crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील बहुप्रतिक्षित सुप्रीम कोर्टाचा निकाल आला. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने दिलेल्या या निकालात महत्त्वाच्या बाबींवर भाष्य करण्यात आलेले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्ष पदाचा दिलेल्या राजीनाम्याचा उल्लेख करत झालेल्या चुकीबद्दल मोठं विधान केलं.
सुप्रीम कोर्टाच्या निकालावर पुण्यात माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, “गेल्या वर्षी जूनमध्ये घटना घडल्या आणि त्यानंतर बऱ्याच राजकीय उलथापालथ झाली. त्याबद्दल अनेकांनी कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टात हे प्रकरण सुरू होतं. आपल्याला आठवत असेल की, हा निकाल यायच्या आधी मी लातूरच्या दौऱ्यावर होतो. त्यावेळी माध्यमांना सांगितलं होतं की, 16 आमदारांचा निर्णय देण्याचा हा निकाल विधानसभा अध्यक्षांकडे येईल. तशाच पद्धतीने घडलं. याचे दुरोगामी परिणाम देशात आता अनेक ठिकाणी… ज्यावेळी असा प्रसंग निर्माण होईल. त्यावेळी याचा दाखला दिला जाईल आणि पुढच्या गोष्टी घडतील.”
पक्षांतर बंदी कायद्याला अर्थ राहणार का? अजित पवारांचा सवाल
अजित पवार पुढे असंही म्हणाले की, “पक्षांतर बंदी कायद्याला आता काही अर्थ राहणार आहे की, नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे. बहुमत असल्यामुळे कुठलीही अडचण येत नव्हती आणि सरकारं व्यवस्थित चालत होती, पण या निर्णयामुळे या सगळ्याच गोष्टीला खिळ बसली की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.”
हेही वाचा >> Maharashtra Political Crisis: सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचा नेमका अर्थ काय?
राज्यपालांच्या भूमिकेवर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले. त्यावर अजित पवार म्हणाले, “राज्यपालांची मी रात्री क्लिप बघितली. ते म्हणाले की, मी राज्यपाल असताना माझ्या सद्विवेक बुद्धीला जे योग्य वाटलं ते केलं, असं स्पष्टपणे कोश्यारी म्हणाले आहेत”, असंही अजित पवार म्हणाले.