बारामतीच्या नटराज नाट्य कला मंडळाच्या विरोधातल्या याचिका बॉम्बे हायकोर्टाने फेटाळल्या

वाचा सविस्तर बातमी कोर्टात नेमकं काय घडलं?
Bombay High Court dismisses pleas against Baramati's Nataraj Natya Kala Mandal
Bombay High Court dismisses pleas against Baramati's Nataraj Natya Kala Mandal

वसंत मोरे, प्रतिनिधी, बारामती

बारामती परिसरात सांस्कृतिक क्षेत्रात सर्वाधिक योगदान देणाऱ्या नटराज नाट्य कला मंडळाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी समाधान व्यक्त केलं आहे.

बारामतीच्या तीन हत्ती चौकालगत आहे नटराज नाट्य कला मंडळ

बारामती येथील नगरपरिषदेच्या मालकीची तीन हत्ती चौकालगत मनोरंजनात्मक हेतू करिता नियोजित असणारी जागा नगरपरिषदेने ठराव करून नटराज नाट्य कला मंडळाला दिली आहे. या संदर्भात भाजपाचे कार्यकर्ते सुरेंद्र श्यामसुंदर जेवरे आणि राहुल नंदू कांबळे यांनी दोन स्वतंत्र याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या. यामध्ये न्यायालयात बाजू मांडताना याचिकाकर्त्यांनी नटराज नाट्य कला मंडळ ही संस्था अस्तित्वातच नसून संस्थेचे बारामती आणि परिसरामध्ये सांस्कृतिक क्षेत्रात कुठल्याही प्रकारचे योगदान नाही असं म्हटलं होतं.

नटराज नाट्य कला मंडळाने केलेल्या कामांचा अहवाल वाचण्यात आला

संस्थेच्या वतीने बाजू मांडताना नटराज नाट्य कला मंडळाच्या स्थापनेपासून ते कोरोना काळामध्ये केलेल्या कामापर्यंतचा अहवाल पुराव्यानिशी वाचून दाखवण्यात आला. याबाबत दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती प्रसन्न बी. वऱ्हाळे व किशोर सी. संत या खंडपीठाने निर्णय देताना नटराज नाट्य कला मंडळाला दिलेली जागा ही योग्य ती सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच देण्यात आल्याचा निष्कर्ष काढला.

याशिवाय याचिकाकर्त्यांनी दाखल केलेल्या दोन्ही याचिकामुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या. याचिकाकर्त्यांच्या वतीने तळेकर अॅड असोसिएट्स व ॲड. सुशांत प्रभुणे या वकिलांनी बाजू मांडली होती तर नटराज नाट्य कला मंडळाच्या वतीने ॲड. अभिजीत पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी बाजू मांडली.

या निर्णयासंदर्भात बोलताना नटराज नाट्य कला मंडळाचे संस्थापक अध्यक्ष किरण गुजर यांनी समाधान व्यक्त केले. बारामती परिसरात सांस्कृतिक क्षेत्रात नटराज नाट्य कला मंडळाचे योगदान सर्वांना माहीत आहे मात्र काही मंडळी खोडसाळ पणाने अशा प्रकारचे विध्वंसक काम करतात. मात्र, अंतिम विजय नेहमी सत्याचा होतो. याबाबत मी एवढेच म्हणेन अशी प्रतिक्रिया दिली."

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in