Anant Chaturdashi : पुढच्या वर्षी लवकर या! लाडक्या बाप्पाला निरोप

अनंत चतुर्दशीच्या दिवशी मिरवणूक आणि धामधूम
Anant Chaturdashi 2022 Ganesh Visarjan lalbaug Raja ganesh galli pune ganpati and All over Maharashtra
Anant Chaturdashi 2022 Ganesh Visarjan lalbaug Raja ganesh galli pune ganpati and All over Maharashtra फोटो सौजन्य-इंडिया टुडे

आज अनंत चतुर्दशी असल्याने मुंबईसह राज्यभरात विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. लाडक्या गणरायाला निरोप देण्याचा आजचा दिवस आहे. दहा दिवस पाहुणा म्हणून आलेले बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या.. आणि गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला या गजरात निरोप घेतील. भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हटलं जातं. गणेश चतुर्थीला बाप्पांचं आगमन होतं आणि अनंत चतुर्दशीला बाप्पा निरोप घेतात.

मिरवणुकीची धामधूम

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या हा गजर संपूर्ण राज्यभरात ऐकू येतो आहे. मागचे दहा दिवस गणपती बाप्पा घरोघरी विराजमान झाले होते. त्याचप्रमाणे सार्वजनिक मंडळांमध्येही बाप्पा विराजमान झाले होते.

मुंबईचा राजा, लालबागचा राजा, पुण्यातले मानाचे पाच गणपती य़ा आणि अशा विविध गणपतींच्या विसर्जन मिरवणुका पाहण्यास मिळतील. दोन वर्षांनी या मिरवणुका निघणार आहेत. कारण मागची दोन वर्ष राज्यावर आणि देशावर कोरोनाचं सावट होतं त्यामुळे गणेश उत्सव अत्यंत साधेपणाने आणि निर्बंधांसह साजरा केला गेला होता.

मुंबईतल्या लालबाग, परळ, गिरगाव या भागातली अनेक गणेश मंडळं आहेत. या गणेश मंडळातल्या गणेश मूर्तींना विसर्जन केलं जाईल. लाडक्या गणरायाला आज गणेश भक्त साश्रू नयनांनी निरोप देतील. कोरोनाचं संकट दूर झाल्यानंतर पहिल्यांदाच भव्य मिरवणुका निघणार आहेत. त्यामुळे या वर्षीचा उत्साह वेगळाच असणार आहे यात काही शंका नाही.

मुंबईतल्या समुद्र किनाऱ्यांवर जय्यत तयारी

मुंबईत अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ३२०० अधिकाऱ्यांसह १५ हजारांहून जास्त पोलीस तैनात आहेत. मुंबईत समुद्र किनाऱ्यांवर महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. २११ स्वागत कक्ष उभारण्यात आले आहेत. पुण्यातही मानाच्या गणपतीच्या मिरवणुकांची तयारी सुरू झाली आहे. तिथेही पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दहा दिवस संपूर्ण राज्यात गणेश उत्सवाचा उत्साह

मागचे दहा दिवस संपूर्ण राज्यात गणेश उत्सवाचा उत्साह पाहण्यास मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निमित्ताने विविध राजकीय भेटीही घेतल्या. त्याचप्रमाणे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील दोन दिवस मुंबईच्या दौऱ्यावर होते. मुंबईच्या दौऱ्यात त्यांनी लालबागचा राजा गणपतीचं दर्शन घेतलं. २१ जूनला राज्यात शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे ४० आमदार वेगळे झाले आहेत. तसंच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं आहे. आता या सरकारकडून महापालिका निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. त्याची तयारीही गणेश उत्सवात पाहण्यास मिळाली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in