मुंबईची खबर : 'स्कॉर्पिओ नको, इनोव्हा द्या' BMC पदाधिकाऱ्यांची मागणी, महापौरांचं समर्थन

मुंबई तक

जानेवारी 2026 मध्ये देण्यात आलेल्या 'स्कॉर्पिओ-एन' गाड्या गैरसोयीच्या असल्याचे सांगत, बीएमसीच्या पदाधिकाऱ्यांनी 'टोयोटा इनोव्हा क्रिस्टा' गाड्यांची मागणी केली आहे. 1.5 कोटी रुपयांच्या या प्रस्तावावर विरोधकांकडून टीका होत असून, आता याला महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.

ADVERTISEMENT

Mumbai News
Mumbai News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबईची खबर

point

'स्कॉर्पिओ नको, इनोव्हा द्या'

point

BMC पदाधिकाऱ्यांची मागणी

point

महापौरांचं समर्थन

Mumbai News : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील (बीएमसी) लोकप्रतिनिधींना जानेवारी 2026 मध्ये महिंद्रा स्कॉर्पिओ-एन गाड्या देण्यात आल्या होत्या. मात्र त्या गाड्या आता अस्वस्थ वाटत असून प्रवास करताना पाठदुखीचा त्रास होत असल्याचा दावा करत नव्या गाड्यांची मागणी करण्यात आली आहे. सभागृह नेते गणेश खणकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी या गाड्या बदलून देण्याची विनंती केली आहे. या नव्या मागणीनुसार उपमहापौर, सभागृह नेते आणि विविध महत्त्वाच्या समित्यांच्या अध्यक्षांसाठी उच्च श्रेणीतील टोयोटा इनोव्हा क्रिस्टा गाड्या खरेदी करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यासाठी पालिकेच्या तिजोरीतून तब्बल 1.5 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सध्या बाजारपेठेत महिंद्रा स्कॉर्पिओ-एनची किंमत 30 लाख रुपयांपर्यंत आहे, तर इनोव्हा क्रिस्टाची किंमत 25 ते 35 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.

'नव्या गाड्या बदलण्याची आवश्यकता नाही'

या उधळपट्टीवरून पालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी नाराजी व्यक्त करत सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. गाड्यांचे वाटप अगदी अलीकडेच झाले असताना, एवढ्या कमी कालावधीत पुन्हा नवीन आणि महागड्या गाड्यांची मागणी करणे म्हणजे पालिकेच्या तिजोरीवर विनाकारण आर्थिक बोजा पाडण्यासारखे आहे, अशी टीका त्यांनी केली. "माझ्यासाठी दिलेल्या स्कॉर्पिओ गाडीबाबत मी कोणतीही तक्रार केलेली नाही किंवा गाडी बदलून मागितलेली नाही. या सर्व गाड्या अगदी नव्या आहेत आणि त्या बदलण्याची कोणतीही आवश्यकता नाही," असे पेडणेकर यांनी स्पष्ट केले. 1.5 कोटींच्या या प्रस्तावात उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते आणि स्थायी समिती, सुधार समिती तसेच शिक्षण समितीच्या अध्यक्षांच्या गाड्यांचा समावेश आहे. दरम्यान, महापौर रितू तावडे यांच्यासाठी 30 ते 35 लाख रुपये किमतीची 'इनोव्हा हायक्रॉस हायब्रिड' गाडी आधीच देण्यात आली आहे.

हे ही वाचा : Ajinkya Rahane Networth : मुंबईत आलिशान घर, लक्झरी कार्स... मराठमोळ्या अजिंक्य रहाणेची संपत्ती आहे तरी किती?

महापौरांचे समर्थन

महापौर रितू तावडे यांनी मात्र पदाधिकाऱ्यांच्या या मागणीचे समर्थन केले आहे. दहिसर, कांदिवली आणि बोरीवली यांसारख्या दूरवरच्या उपनगरांतून काही समिती अध्यक्ष दररोज पालिकेत येतात, त्यामुळे प्रवासाच्या सोयीसाठी ही मागणी रास्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रक्रियेसाठी नवीन कोणतीही निविदा (Tender) काढण्याची गरज भासणार नाही, केवळ उपलब्ध गाड्यांच्या ऐवजी दुसऱ्या प्रकारच्या गाड्या मागण्यात आल्या आहेत, असा दावाही महापौरांनी केला. हा प्रस्ताव लवकरच अंतिम मंजुरीसाठी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे पाठवला जाणार आहे. सध्या पालिकेत केवळ पालिका आयुक्तच इलेक्ट्रिक वाहनाचा (EV) वापर करत आहेत, तर इतर पदाधिकाऱ्यांसाठी स्कॉर्पिओ गाड्यांची सोय करण्यात आली होती.

हे ही वाचा : 3 लेकरांची आई प्रियकराची प्रेमात आकंठ बुडाली, पतीला धारदार शस्त्रांनी कापून काढलं

प्रशासकीय अधिकारी काय म्हणाले?

दरम्यान, या बदलामुळे पालिकेच्या कामात कोणताही अडथळा येणार नसल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पालिकेने 5 वर्षांच्या कालावधीसाठी या स्कॉर्पिओ गाड्या खरेदी केल्या होत्या. त्यातील काही गाड्या पदाधिकाऱ्यांना तर काही वॉर्ड अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. मात्र, सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांना नवीन गाड्या मिळू न शकल्याने काहींना अद्याप जुन्याच गाड्या वापराव्या लागत आहेत. त्यामुळे पदाधिकाऱ्यांकडून जमा होणाऱ्या या स्कॉर्पिओ गाड्या जुन्या गाड्या वापरणाऱ्या वॉर्ड अधिकाऱ्यांना देण्यात येतील, अशी माहिती पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. सभागृह नेते गणेश खणकर यांनीही गटनेत्यांच्या बैठकीत गाड्या बदलून मिळण्याबाबत मागणी केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.