'...तोवर आझाद मैदान सोडणार नाही', मनोज जरांगे ठाम… CSMT बाहेर नेमकं काय घडतंय?
मुंबई पोलीस प्रशासन आंदोलकांना शांततेत आंदोलन संपवण्याची मागणी करत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, आझाद मैदान दुपारी 3 वाजेपर्यंत रिकामं करण्याच्या दृष्टीने पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे.

बातम्या हायलाइट

आझाद मैदान रिकामे करण्यासाठी मुंबई पोलिसांची कारवाई

'...तोवर आझाद मैदान सोडणार नाही', मनोज जरांगे ठाम

CSMT बाहेर नेमकं काय घडतंय?
Maratha Reservation Movement Mumbai: मुंबईतील आझाद मैदान रिकामं करण्यासाठी मराठा आंदोलकांवर मुंबई पोलिसांनी कारवाई सुरू केली असल्याचं पाहायला मिळतंय. यादरम्यान, मराठा आंदोलक आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वाद सुरू असल्याचं देखील सांगितलं जात आहे. मुंबई पोलीस प्रशासन आंदोलकांना शांततेत आंदोलन संपवण्याची मागणी करत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, आझाद मैदान दुपारी 3 वाजेपर्यंत रिकामं करण्याच्या दृष्टीने पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलकांना आवाहन
दरम्यान, आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन करत त्यांच्या समर्थकांना आंदोलनाचं स्थळ रिकामं करण्यास सांगितलं आहे. त्यांनी आंदोलकांना सांगितलं की, वाहनांसह आलेले आंदोलक मुंबईबाहेर जातील आणि आंदोलनस्थळी फक्त 5000 लोक राहतील. खरं तर, मंगळवारी सकाळी, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करून, मुंबई पोलिसांनी मराठा आरक्षण नेते जरांगे पाटील यांना नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल नोटीस बजावली होती. तसेच, आंदोलकांना आझाद मैदान रिकामं करण्याचं आवाहन करण्यात आलं. जरांगे पाटील यांनी माध्यमांमध्ये दिलेल्या विधानांची पोलिसांनी दखल घेतली असून त्यांचा नोटीसमध्ये समावेश केला असल्याचं या नोटीसमध्ये नमूद केलं आहे.
हे ही वाचा: 'दुपारी 3 वाजेपर्यंत रस्ते रिकामे करा अन्यथा...' हायकोर्टाचा सरकारला आदेश, आता उरला अवघा अर्धा तास.. मुंबईत काय सुरू?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिला इशारा
पोलिसांच्या नोटीसनंतर आझाद मैदानावर आपल्या समर्थकांना संबोधित करताना जरांगे पाटील म्हणाले की, त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत ते मुंबई सोडणार नाहीत, जरी त्यांचा जीव गेला तरीही. तसेच, त्यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचे आणि हिंसाचार टाळण्याचे आवाहन केले. जरंगे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला की “जर सरकार मराठा समाजाचा आदर करत असेल तर तेही सरकारचा आदर करतील.”
हे ही वाचा: जरांगेंची मागणी पूर्ण होऊ शकते का? जर उत्तर 'हो' असेल, तर मराठा समाजाला नेमकं किती मिळेल आरक्षण?
मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
पोलिसांनी सांगितले की, आंदोलन सुरू ठेवण्यासाठी पोलीस परवानगी वाढवून देण्यासाठी काल रात्री अर्ज करण्यात आला होता. जो मंगळवारी सकाळी पोलिसांनी फेटाळला आणि आंदोलकांना रस्ते रिकामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यावर, पोलिसांच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं आंदोलकांनी सांगितलं. सोमवारी एका याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं की मराठा आरक्षणाचं आंदोलन शांततेत नव्हतं तसेच त्यात सर्व अटींचे उल्लंघन झालं होतं. त्यामुळे न्यायालयाने जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांना मंगळवारपर्यंत आझाद मैदान वगळता मुंबईतील सर्व भाग रिकामे करण्याचा अल्टिमेटम दिला होता.