पत्नीची छेड काढणाऱ्या तरुणाची पतीने डोक्यात दगड घालून केली हत्या; बुलढाणा पोलिसांकडून आरोपीला वाशिममधून अटक
Buldhana Crime : मिळालेल्या माहितीनुसार, 3 मार्च रोजी मेहकर शहरापासून काही अंतरावर एका शेतात 28 वर्षीय तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. राहुल भानुदास बाजड (वय २८) असे मृत तरुणाचे नाव आहे. राहुलचा मृतदेह आढळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच राहुलच्या मामाने मेहकर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पत्नीची छेड काढणाऱ्या तरुणाची पतीने डोक्यात दगड घालून केली हत्या
बुलढाणा पोलिसांकडून आरोपीला वाशिममधून अटक
Buldhana Crime , जका खान : पत्नीची छेड काढल्याच्या रागातून एका 38 वर्षीय पतीने एका तरुणाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी मेहकर पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी पतीला वाशिम जिल्ह्यातून बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, 3 मार्च रोजी मेहकर शहरापासून काही अंतरावर एका शेतात 28 वर्षीय तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. राहुल भानुदास बाजड (वय 28) असे मृत तरुणाचे नाव आहे. राहुलचा मृतदेह आढळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच राहुलच्या मामाने मेहकर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. आपल्या भाच्याची हत्या करण्यात आली असून, संशयास्पद व्यक्तीबाबतही त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांचा तपास आणि फॉरेन्सिक टीम पाचारण
घटनेचे गांभीर्य ओळखून मेहकर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. मृतदेहाची पाहणी केली असता, राहुलचा चेहरा आणि डोके मोठ्या दगडाने ठेचून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकालाही पाचारण केले होते. तांत्रिक पुरावे आणि मृताच्या नातेवाईकांनी व्यक्त केलेल्या संशयावरून पोलिसांनी तपासचक्र वेगाने फिरवले.
आरोपीला वाशिममधून ठोकल्या बेड्या
मृताच्या मामाने ज्या व्यक्तीवर संशय व्यक्त केला होता, तो आरोपी ओम शामराव केनवडकर (वय 38) हा घटनेनंतर फरार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत असताना तो वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील केनवड गावातील आपल्या शेतात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला तिथून ताब्यात घेतले.










