ठाणेकरांनो काळजी घ्या! कोरोना नाहीतर 'हा' आजार पसरतोय वेगात, ४ जणांनी गमावले प्राण

पावसाळ्याच्या दिवसात विविध आजर आणि साथीचे रोग डोकं वर काढत असतात.
ठाणेकरांनो काळजी घ्या! कोरोना नाहीतर 'हा' आजार पसरतोय वेगात, ४ जणांनी गमावले प्राण

ठाणे: पावसाळ्याच्या दिवसात विविध आजर आणि साथीचे रोग डोकं वर काढत असतात. त्यात डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्ल्यू (Swine Flu) सारख्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झालेली पाहायला मिळत आहे. ठाण्यात स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांची संख्या २० वर गेली आहे तर डेंग्यूचे १४ रुग्ण सक्रीय असल्याने चिंतेचं वातावरण तयार झाले आहे. यासाठी महापालिका उपाययोजना करत असून नागरिकांनी देखील आपली स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन ठाणे महानगर पालिका (Thane Muncipal Corporation) आयुक्तांनी केलं आहे.

स्वाईन फ्ल्यूने २ जणांनी गमावले प्राण

ठाणे महानगर पालिकेत स्वाईन फ्ल्यू आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे. ठाणे महानगर पालिका क्षेत्रात यंदाच्या वर्षी पावसाळ्यात स्वाईन फ्ल्यूचे २० रुग्ण आढळून आले असून त्यापैकी २ रुग्ण दगावले आहेत. तर डेंग्यूचे १४ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासाठी ठाणे महानगर पालिका प्रशासनाकडून उपाययोजना म्हणून महापालिका स्तरावरून फवारणी आणि फॉगिंगसारखे उपक्रम हाती घेऊन बळकट करण्यात आले आहेत. तसेच डेंग्यूचे रुग्ण ज्या परिसरात आढळतात त्या परिसरात ठाणे महानगरपालिकाकडून पथक रवाना केले जात आहे.

महिला आणि लहान मुलांनी काळजी घेण्याचे आवाहन

महापालिका पथक मच्छर उत्पत्ती होणारे ठिकाण शोधून ते उद्ध्वस्थ करण्याचे काम करत आहे. तसेच आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृती करून उघड्या पाण्याचा साठा म्हणजेच जुने टायर, कुलर, बदल्या, ड्रममध्ये पाणी साचवून ठेवू नये अशा सूचना देत फवारणी केली जाते. उघड्या आणि साचलेल्या पाण्यामध्ये डेंग्यूच्या मच्छरांची उत्पत्ती होत असल्याने पाणी उघडे आणि साचवून ठेऊ नका असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. डेंग्यूचे मच्छर हे दिवसा चावत असल्यामुळे विशेष करून महिलांनी आणि लहान मुलांनी जास्त काळजी घेणे आणि सुरक्षित राहणे गरजेच असल्याचे आवाहन ठाणे महानगर पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.

स्वाईन फ्ल्यूचा रुग्ण आढळल्यास त्वरित कॉंटॅक्ट ट्रेसिंग

ठाण्यात वाढत असलेल्या स्वाईन फ्ल्यूसाठी उपाययोजना म्हणून ठाणे महानगरपालिकेकडून सर्व खाजगी वैद्यकीय पथकांना अशा प्रकारचे रुग्ण आढळले की तात्काळ ठाणे महानगर पालिकेला कळवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशा प्रकारचे रुग्ण आढळून आले की महापालिकेचे एक पथक लगेचच रुग्णाच्या घरी जाऊन कॉंटॅक्ट ट्रेसिंगचे काम करत आहे. तसेच बाधित रुग्णाला अर्बन हेल्पच्या माध्यमातून औषध गोळ्या उपचार सुरु करण्यात येते. तसेच या स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांसाठी ठाण्यातील माजिवडा येथील पार्किंग प्लाझा जम्बो फॅसिलिटी सेंटर येथे आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले असल्याचे ठाणे महानगर पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सांगितले आहे.

मंकी फॉक्सचा रुग्ण नाहीतरी विशेष काळजी

ठाण्यात मंकी फॉक्सचे अद्याप रुग्ण आढळून आले नसले तरी त्यांच्यासाठी देखील आयसोलेशन वॉर्ड पार्किंग प्लाझा जम्बो फॅसिलिटी येथे तयार करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे. तर या सर्व आजारांपासून वाचवण्यासाठी सर्व ठाणेकरांनी स्वतःची काळजी घेऊन दिलेल्या उपाययोजनांचे पालन करण्याची विनंती पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा केल आहे.

डॉक्टरांनी केले काळजी घेण्याचे आवाहन

सध्या ठाण्यात स्वाईन फ्ल्यूचे आत्तापर्यंत २० रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे याचा प्रादुर्भाव थांबवा यासाठी सोशल डिस्टंसिंग, मास्क वापरणे, हाथ स्वच्छ धुवून, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे गरजेच असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. तसेच सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप, उलटी होत असेल तर त्वरित जवळच्या सरकारी रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी. कारण पुढे जाऊन न्युमोनिया होण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळेवर सरकारी दवाखान्यात तपासणी करून वैद्यकीय उपचार सुरु करण्याचे आवाहन ठाणे महानगर पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिर्जीत शिंदे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in