कामगार ते खासदार… कसे होते गिरीश बापट?, शरद पवारांनी सांगितले किस्से
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी कामगार गिरीश बापट ते खासदार गिरीश बापट यांच्याबद्दलच्या अनेक आठवणी आणि किस्से सांगितले.
ADVERTISEMENT

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं दीर्घ आजाराने काही दिवसांपूर्वी निधन झालं. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे दिवंगत खासदार गिरीश बापट यांची श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते. यावेळी शरद पवारांनी कामगार गिरीश बापट ते खासदार गिरीश बापट यांच्याबद्दलच्या अनेक आठवणी आणि किस्से सांगितले.
शरद पवारांनी सांगितल्या आठवणी
माझ्यामध्ये व गिरीश बापट यांच्यामध्ये वयाचे व सार्वजनिक कालखंडाचे अंतर होते. मी ज्या महाविद्यालयातून शिकलो ते बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची कधी काळी बैठक असायची. त्या बैठकीमध्ये गिरीश बापट आर्वजून उपस्थित असायचे. ते देखील याच कॉलेजचे माजी विद्यार्थी होते. पुण्यामध्ये टेल्को महत्त्वाची कंपनी होती. त्यामध्ये गिरीश बापट काम करायचे. अतिशय उत्तम चालणारी कंपनी परंतु एक काळ असा आला की, त्या ठिकाणी संप झाला.
संपाच्या नेतृत्वाने टोक्याला जाण्याचे काम केले. चाळीस दिवसांपेक्षा अधिक काळ टेल्कोमध्ये संप होता. वाटाघाटी केल्या. पण नेतृत्व चमत्कारिक होते. त्यामुळे मार्ग काही निघेना. त्या लोकांनी शनिवार वाड्याला जाऊन निर्दशने करण्याचा निर्णय घेतला आणि रात्री मुक्कामाला राहण्याची भूमिका घेतली. पोलिस दल एकत्र केले रातोरात अटक केली. काहींना सावंतवाडीला पाठवले तर काहींना रत्नागिरीला पाठवले, काहींना आणखी काही ठिकाणी पाठवलं. कामगारांच्या लक्षात आले की चुकीच्या नेतृत्वाखाली आपण वागलो की त्याचे दुष्परिणाम होतात व योग्य सल्ला आणि चौकटीच्या बाहेर कधी कामगार चळवळीत जायचं नाही अशी भूमिका मानणारे थोडे कामगारामधील सहकारी होते त्यामध्ये गिरीश बापट होते.
शरद पवार-गिरीश बापट मैत्री
पुणे शहरात माझा संपर्क कमी असायचा. ग्रामीण भागात संपर्क अधिक असायचा. महानगरपालिकेत कस काम चाललं आहे याची मी माहिती घेत असे. ज्या महानगरपालिकेत एक तरुण वर्ग एकजूट झाला. नागरी प्रश्नांसाठी पक्ष कुठलाही असो पुण्याच्या भवितव्यासाठी आपण एकत्रित भूमिका घेतली पाहिजे अशा प्रकारचे चित्र त्यांनी या ठिकाणी मांडले. त्यामध्ये गिरीश बापट होते, अंकुश काकडे होते आणि बाकीचे त्यांचे सहकारी होते. राजकारणाच्या पलीकडे त्यांनी आपली मैत्री जपली.










