मर्सिडिजपेक्षा महागडा घोडा, 15 कोटींच्या 'ब्रम्होस'ची चर्चा! रोज 15 लिटर दूध अन् पौष्टिक खुराक
Brahmos horse : नागेश देसाई यांच्या देसाई स्टडफॉर्मच्या या घोड्याला पुष्कर बाजारात 8 कोटी रुपयांपर्यंत बोली लागली होती. परंतु देसाई कुटुंब 15 कोटी किंमत असूनही ब्रम्होस विक्रीसाठी तयार नाही.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मर्सिडिजपेक्षा महागडा घोडा
15 कोटींच्या 'ब्रम्होस'ची चर्चा!
रोज 15 लिटर दूध अन् पौष्टिक खुराक
नंदुरबार : एखाद्या लक्झरी मर्सेडिजपेक्षाही महागडा घोडा पाहायला मिळावा, असे सहसा घडत नाही. मात्र यंदाच्या सारंगखेडा चेतक फेस्टिव्हलमध्ये असा एक अनोखा घोडा पाहायला मिळाला आहे. गुजरातमधून आणलेला ‘ब्रम्होस’ नावाचा हा घोडा तब्बल 15 कोटी रुपये किमतीचा असल्याची चर्चा असून, त्याला पाहण्यासाठी बाजारात प्रचंड गर्दी उसळली आहे. घोड्याच्या प्रत्येक चालीत दिसणारा रुबाब, आकर्षक ठेवण आणि लयबद्ध चाल यामुळे ब्रम्होस हा या बाजाराचा ‘शोस्टॉपर’ ठरला आहे.
गुजरातच्या नागेश देसाई यांच्या देसाई स्टडफॉर्मवर पाळलेला हा घोडा आधीपासूनच देशभरात चर्चेत आहे. काळ्या रंगाचा, 63 इंच उंच आणि केवळ 36 महिन्यांचा हा मारवाडी जातीचा घोडा आपल्या उठावदार ठेवणीसाठी ओळखला जातो. कपाळावरचा आकर्षक पांढरा पट्टा आणि मादक चाल यामुळे तो सर्वांमध्ये उठून दिसतो. पुष्कर बाजारात या घोड्याला 8 कोटी रुपयांपर्यंत बोली लागली होती. मात्र, देसाई कुटुंबाने स्पष्ट सांगितले आहे की, 15 कोटी रुपयांची ऑफर आली तरीही ब्रम्होस विक्रीसाठी नाही.
हेही वाचा : नाशिक : पत्नीचं अफेअर असल्याचा संशय, पतीने बुटाच्या लेसने गळा आवळला; जागेवर संपवलं
दिवसभर विशेष काळजी, तब्येतीवर मोठा खर्च आणि तज्ज्ञांची निगा—हीच ब्रम्होसची खास जडणघडण. या घोड्याला दिवसभरात तब्बल 15 लिटर दूध, याशिवाय अश्वतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उच्च प्रतीचे पौष्टिक खाद्य दिले जाते. याच्या रोजच्या देखभालीसाठी स्वतंत्र मजूर, मसाज आणि ग्रुमिंगचीही विशेष सोय असते. त्यामुळेच देशातील विविध अश्वस्पर्धांमध्ये ब्रम्होस सातत्याने पहिल्या क्रमांकावर आला आहे.










