भरधाव मर्सिडीजने दुचाकीला उडवलं, 23 वर्षीय कुणाल जागीच ठार, एक जण जखमी; कारमध्ये कोण कोण होतं?
सिंहगड रोड पोलिस ठाण्यात या प्रकरणी कारमधील चौघांविरुद्ध खुनासारख्या गुन्ह्याचा (culpable homicide not amounting to murder) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पुण्यात मर्सिडीज कारची दुचाकीला धडक

दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघांपैकी एकाचा जागीच मृत्यू
पुणे : पुण्यातील पोर्शे कार प्रकरण देशभरात गाजलं होतं. बेफाम गाडी चालवत धनाड्या बापाच्या मुलानं केलेल्या अपघातात दोन तरूण विद्यार्थ्यांचा अंत झाला होता. त्यातच आता पुण्यातील वडगाव पुलाजवळ शनिवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. एका मर्सिडीज कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात चिंचवडमधील कुणाल मनोज हुशार (वय 23) याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र प्रज्योत दीपक पुजारी (वय 21) गंभीर जखमी झाला आहे. प्रज्योतवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हे ही वाचा >> जन्मदात्या बापानं मुलाला संपवलं, आठ दिवसाआधी त्याच मुलानं केला होता स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
कसा झाला अपघात?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम राजेंद्र भोसले (वय 27) याने चालवलेली मर्सिडीज कार (MH 01 BK 4625) सातारा रस्त्यावरून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने येत होती. यावेळी कुणाल आणि प्रज्योत यांची दुचाकी (MH 12 VH 4340) समोर आली. कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने कुणालचा जागीच मृत्यू झाला. तर प्रज्योत गंभीर जखमी झाला.
कारमध्ये कोण कोण होतं?
धडकेनंतर कार पुढे जाऊन सर्व्हिस रोड ओलांडून फुटपाथवर आदळली. कारमधील चारही प्रवासी शुभम भोसले, निखिल मिलिंद रानवाडे (वय 26), श्रेयस रामकृष्ण सोलंखी (वय 25) आणि वेदांत इंद्रसिंग राजपूत (वय 28) हे देखील जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हे ही वाचा >> माय लेकीनं मिळून मयूरला गुंगीचं औषध दिलं, पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहच पेटवला अन्...
सिंहगड रोड पोलिस ठाण्यात या प्रकरणी कारमधील चौघांविरुद्ध खुनासारख्या गुन्ह्याचा (culpable homicide not amounting to murder) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी पुण्यातील औंधगाव, चिंचवड आणि निगडी परिसरातील रहिवासी आहेत. पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की, कारचा वेग खूप जास्त होता, ज्यामुळे हा अपघात घडला. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.