
गेल्या काही महिन्यांपासून ठराविक काळानंतर सातत्यानं एक चर्चा डोकं वर काढतेय, ती म्हणजे काँग्रेसचे आमदार (Congress MLA) भाजपत (BJP) जाणार. या चर्चांमुळे वेगवेगळ्या नेत्यांची नावंही जोडली गेली. पण, आता लातूरचे भाजपचे नेते (BJP Leader) संभाजी पाटील निलंगेकरांनी (Sambhaji Patil nilangekar) केलेल्या विधानाने राजकीय वर्तुळातून अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. निलंगेकरांच्या विधानाने लातूरचे काँग्रेसचे नेते (Latur congress Leader) भाजपच्या वाटेवर असल्याचा मुद्दा चर्चेत आलाय.
लातूरच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून आमदार अमित देशमुख आणि आमदार धीरज देशमुख हे भाजपत जाणार असल्याची कुजबूज सुरू आहे. मात्र, याबद्दल काँग्रेस आणि भाजपकडून कोणतंही भाष्य केलं गेलं नाही. मात्र, संभाजी पाटील निलंगेकर यांनी विधान केल्यानं हा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय.
अमित देशमुख यांच्याबद्दल भाजपचे नेते संभाजी पाटील निलंगेकर यांनी एका कार्यक्रमात भाष्य केलं. संभाजी पाटील निलंगेकर हे लातूरमध्ये जिल्हा भाजप युवा मोर्चा मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्यात निलंगेकरांनी अमित देशमुखांबद्दल विधान केलंय.
संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटलंय की, 'लातूरचे प्रिन्स राजकुमार असलेले आमदार अमित देशमुख हे कधीही जनतेचे प्रश्न घेऊन लोकांत गेलेले नाहीत. आता भाजपत येतो, अशी हवा त्यांनी निर्माण केली होती. त्यांना सतत सत्तेत राहण्याचा सोस आहे. मात्र, त्यांना आम्ही भाजपत घेणार नाही आणि ते त्यांचं भाजपत आलेले कार्यकर्त्यांना बिलकुल आवडणार नाही,' असं म्हणत संभाजी पाटील निलंगेकरांनी देशमुखांना विरोधही दर्शवलाय.
संभाजी पाटील निलंगेकर यांनी थेटपणे अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांच्या भाजपत प्रवेशाला विरोध केलाय. दुसरीकडे भाजपनं लातूर महापालिका निवडणुकीचीही तयारी सुरू केलीये. महत्त्वाचं म्हणजे भाजपनं महापालिका निवडणुकीत ज्येष्ठांना बाजूला करण्याचं धोरण स्वीकारल्याचं दिसत आहे.
संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, 'जे कार्यकर्ते 35 वर्षाच्या आतले आहेत, त्यांनी निवडणुकीची तयारी करावी. महापालिकेच्या 80 टक्के जागांवर 35 वर्षाच्या आतील कार्यकर्त्यांना संधी देण्यात येईल, असं संभाजी पाटील निलंगेकरांनी या कार्यक्रमात स्पष्ट केलं.
भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अमित देशमुख आणि अशोक चव्हाणांबद्दल विधानं केलं होतं. "काँग्रेसचं आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही. लातूरकर आणि नांदेडकर कधीही फडवणवीसांच्या मांडीवर जाऊन बसतील," असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी अशोक चव्हाण आणि अमित देशमुख यांचा नामोल्लेख न करता केलं होतं.