डफ पोरका झाला! कलगीतुरा परंपरेतील ज्येष्ठ शाहीर रामदास गुंड यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन
कलगीतुरा परंपरेतील ज्येष्ठ शाहीर रामदास नाथाजी गुंड यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे. जांभूळ आख्यान तसेच शिव-पार्वतीची कथा यांसारखे विषय त्यांनी प्रभावी शैलीतून समाजासमोर मांडले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
डफ पोरका झाला!
कलगीतुरा परंपरेतील ज्येष्ठ शाहीर रामदास गुंड यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन
Shahir Ramdas Gund Death, रायचंद शिंदे : महाराष्ट्र राज्य शाहिरी संघटनेचे अध्यक्ष आणि कलगीतुरा परंपरेतील ज्येष्ठ शाहीर रामदास नाथाजी गुंड यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे. कलगीतुऱ्याच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रभर असंख्य कार्यक्रम सादर करत लोककलेला एक वेगळं स्थान मिळवून दिलं. जांभूळ आख्यान तसेच शिव-पार्वतीची कथा यांसारखे विषय त्यांनी प्रभावी शैलीतून समाजासमोर मांडले.
तरुण पिढीला प्रेरणा
शाहीर गुंड यांचे गाव अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील काताळवेढे असून त्यांचा पुणे जिल्ह्यातील गावागावात मोठा संपर्क होता. गावोगावी फिरून सामाजिक प्रश्नांवर भाष्य करत त्यांनी तरुण पिढीला प्रेरणा दिली. त्यांच्या कार्यातून अनेक नवोदित कलाकार घडले आणि शाहिरी परंपरेला नवं बळ मिळालं. त्यांच्या निधनाने या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
हे ही वाचा : धाराशिव : तहसीलदाराची गाडी अडवून तक्रारदाराचा तुफान राडा, दोघांवर गुन्हा दाखल VIDEO
वर्तमानकाळावर भाष्य करणारे शाहीर
महागाई, कांदा दर, दूध दरवाढ, आरक्षण, बैलगाडा बंदी, बालविवाह, स्त्रीभ्रूण हत्या, शिक्षणाची गरज, बदलते राजकारण, जागतिक युद्ध, कोरोना महामारी, व्यसनमुक्ती, बिबट हल्ले अशा विविध विषयांवर त्यांनी आपल्या शाहिरीतून प्रभावीपणे आवाज उठवला. भगवी वस्त्रे, जरीकाम, मानेवर रुळणारे केस आणि हातात डफ अशी त्यांची ओळख. डफावर पहिली थाप पडताच श्रोत्यांना पुराणकथांच्या विश्वात घेऊन जाणारा हा अवलिया कलाकार.
हे ही वाचा : पुण्यात खळबळ : वकिलाच्या पत्नीने केबीनमध्येच केली सेक्रेटरी महिलेची हत्या; अनैतिक संबंध अन् रक्ताचा सडा
डफ पोरका झाला
तासन्तास चालणाऱ्या कलगी-तुरा फडात स्त्री-पुरुष श्रेष्ठत्वावर सवाल-जवाब रंगायचे. चार वेद, सहा शास्त्र आणि अठरा पुराणांचा भेद मांडणारा हा दुर्मिळ प्रकार त्यांनी जिवंत ठेवला. आज हा शाहिरी प्रांतातील तरबेज ‘गुंड’ शांत झाला आणि त्याचा डफ आता पोरका झाला.









