धाराशिव : तहसीलदाराची गाडी अडवून तक्रारदाराचा तुफान राडा, दोघांवर गुन्हा दाखल VIDEO

मुंबई तक

Dharashiv Paranda News : परंडा येथे अवैध वाळू कारवाईसाठी जात असलेल्या तहसीलदारांना अडवून जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी योगेश मेटकरीसह एकावर गुन्हा दाखल केला असून महसूल कर्मचाऱ्यांनी आरोपीवर एमपीडीए (MPDA) अंतर्गत कारवाईची मागणी केली आहे.

ADVERTISEMENT

Dharashiv Paranda News
Dharashiv Paranda News
google news

बातम्या हायलाइट

point

धाराशिव : तहसीलदाराची गाडी अडवून तक्रारदाराचा तुफान राडा

point

दोघांवर गुन्हा दाखल VIDEO

Dharashiv Paranda News : धाराशिव जिल्ह्यातील परांड्याचे तहसील कार्यालयाच्या आवारात अवैध वाळू उपशाच्या तक्रारीवरून तहसीलदार आणि तक्रारदार यांच्यात जोरदार राडा झाला असून, तहसीलदारांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तहसीलदार निलेश काकडे हे आपल्या पथकासह चांदणी नदीपात्रात होत असलेल्या अवैध वाळू उत्खननावर कारवाई करण्यासाठी निघाले असताना, कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच त्यांची गाडी अडवण्यात आली. तक्रारदार योगेश मेटकरी आणि त्याच्यासोबत असलेल्या अन्य एका व्यक्तीने तहसीलदारांच्या गाडीसमोर येऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करत शिवीगाळ केली. माझ्या निवेदनावर आत्ताच कारवाई करा, नाहीतर तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशा शब्दांत तहसीलदारांना धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी तहसीलदारांच्या गाडीत त्यांची चिमुकली मुलगी आणि महसूल विभागाचे कर्मचारीही उपस्थित होते, या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून संपूर्ण जिल्ह्यात या घटनेची चर्चा सुरू आहे.

शासकीय कामात अडथळा आणि तहसीलदारांची पोलिसांत फिर्याद

या प्रकरणाची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, 15 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तहसीलदार निलेश काकडे यांना चांदणी नदी परिसरात वाळूचे अवैध उत्खनन सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी ते आपल्या सहकाऱ्यांसह शासकीय वाहनातून निघाले होते. मात्र, तहसील कार्यालयाच्या गेटवरच योगेश मेटकरी याने गाडी अडवून तहसीलदारांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्याने गाडीच्या काचांवर हाताने मारत गोंधळ घातला आणि जुन्या तक्रारींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. तहसीलदारांनी चौकशी सुरू असल्याचे वारंवार सांगूनही आरोपीने ऐकले नाही आणि थेट जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे तहसीलदारांना आपली कारवाई थांबवून पोलीस ठाणे गाठावे लागले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेबाबत तहसीलदारांच्या फिर्यादीवरून योगेश मेटकरी आणि त्याच्या साथीदारावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : प्रेम प्रकरणातून मामाच्या मुलाने आत्याच्या मुलीचा केला खून, नंतर स्वत: रेल्वेखाली उडी मारत संपवलं जीवन

महसूल विभागाचे काम बंद आंदोलन आणि बेमुदत उपोषणाचा इशारा

तहसीलदारांसारख्या जबाबदार अधिकाऱ्याला कार्यालयाच्या आवारातच अशा प्रकारे धमकी मिळाल्याने संपूर्ण महसूल विभाग प्रचंड आक्रमक झाला आहे. महसूल कर्मचारी संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध करत तातडीने काम बंद आंदोलन पुकारले आहे. जोपर्यंत संबंधित आरोपींना अटक केली जात नाही आणि त्यांच्यावर एमपीडीए (MPDA) कायद्यांतर्गत कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत काम सुरू करणार नसल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. तहसीलदारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, भर दिवसा आणि शासकीय कार्यालयात अशी घटना घडणे हे प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची करणारे असल्याचे महसूल अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या आंदोलनामुळे परंडा तहसील कार्यालयाचे कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले असून, नागरिकांची कामे खोळंबली आहेत. जर तातडीने कारवाई झाली नाही, तर हे आंदोलन संपूर्ण जिल्हाभर पसरवण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.

हे वाचलं का?