नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या कोठडीत वाढ; नरबळी दिल्याचा संशय, रिव्हॉल्वरमधील पाच गोळ्या वापरल्या

मुंबई तक

Ashok Kharat Police custody extended : नाशिकमधील महिला लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, तपासात नरबळी आणि अघोरी कृत्यांचा धक्कादायक संशय व्यक्त करण्यात आला आहे. आरोपीकडून असलेले रिव्हॉल्वर, 6 लाख रुपयांची रोकड आणि वन्य प्राण्यांचे अवशेष जप्त करण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

ADVERTISEMENT

Ashok Kharat Police custody extended
Ashok Kharat Police custody extended
google news

बातम्या हायलाइट

point

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या कोठडीत वाढ

point

नरबळी दिल्याचा संशय, रिव्हॉल्वरमधील पाच गोळ्या वापरल्या

Ashok Kharat Police custody extended : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या महिला लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी भोंदूबाबा अशोक खरात याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने 29 मार्चपर्यंत वाढ केली आहे. आज कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते, जिथे तपासाची व्याप्ती आणि समोर आलेली गंभीर तथ्ये लक्षात घेता सरकारी पक्षाने कोठडी वाढवण्याची आग्रही मागणी केली. सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, आरोपीच्या अघोरी कृत्यांचा शोध घेण्यासाठी आणि जप्त करण्यात आलेल्या पुराव्यांची पडताळणी करण्यासाठी पोलिसांना आणखी वेळ आवश्यक आहे. या प्रकरणातील गुंतागुंत पाहता आणि तपासात रोज नवनवीन खुलासे होत असल्याने न्यायालयाने आरोपीला पुन्हा एकदा पोलीस कोठडीत पाठवण्याचा निर्णय घेतला.

रिव्हॉल्वर, वापरलेल्या गोळ्या आणि 5 जणांचा नरबळी दिल्याचा संशय

पोलीस तपासात आतापर्यंत झालेल्या कारवाईत आरोपी खरात याच्याकडून 6 लाख रुपयांची रोकड, अ‍ॅपल कंपनीचा लॅपटॉप आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआर (DVR) हस्तगत करण्यात आला आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे त्याच्याकडे एक काळे रिव्हॉल्वर मिळून आले असून, विशेष म्हणजे त्यावर चक्क भारत सरकारचे अधिकृत चिन्ह कोरलेले आहे. या रिव्हॉल्वरमधून 5 गोळ्या झाडण्यात आल्याचे किंवा वापरल्या गेल्याचे स्पष्ट झाले असून, त्या नेमक्या कशासाठी वापरल्या गेल्या, याचा सखोल शोध पोलीस घेत आहेत. सरकारी वकिलांनी न्यायालयात असा खळबळजनक संशय व्यक्त केला आहे की, आरोपीने अघोरी प्रथांच्या नावाखाली 5 जणांचा नरबळी तर दिला नाही ना? जप्त केलेल्या पिस्तूल आणि वापरलेल्या पुंगळ्यांचा थेट संबंध नरबळीशी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.

शिवानिका संस्थानची मालमत्ता आणि वन्य प्राण्यांच्या शिकारीचा तपास

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आरोपीच्या 'शिवानिका संस्थान'ची अफाट मालमत्ता आणि तेथे चालणाऱ्या अघोरी कृत्यांचा पर्दाफाश करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. खरात याने लोकांना घाबरवण्यासाठी वापरलेले साप आणि वाघाचे कातडे हे खरे आहेत की बनावट, याची तांत्रिक तपासणी केली जात आहे. तसेच, त्याच्याकडे हरणाची कस्तुरी मिळून आल्याने त्याने जंगलात हरणाची शिकार केली आहे का, या दिशेनेही संशय बळावला आहे. या संपूर्ण रॅकेटमध्ये कोणीतरी खूप मोठी आणि प्रभावशाली व्यक्ती सामील असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मागील 7 दिवसांच्या कोठडीत आरोपीची मानसिक विकृती आणि त्याचे अमानुष वागणे समोर आले असून, आता अधिक सखोल तपासासाठी पुन्हा एकदा सात दिवसांची कोठडी मिळावी, अशी मागणी पोलिसांकडून करण्यात आली होती.

आरोपी अशोक खरात याने केवळ महिलांचे लैंगिक शोषण केले नाही, तर धर्माच्या नावाखाली अनेक अघोरी आणि अनिष्ट प्रथा राबवल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. गेल्या आठवड्यात दिलेल्या पोलीस कोठडीत (PCR) पोलिसांच्या हाती अनेक महत्त्वाचे धागेदोरे लागले असून, आता या पुराव्यांची साखळी जोडण्याचे काम सुरू आहे. भारत सरकारचे चिन्ह असलेले शस्त्र त्याच्याकडे कुठून आले आणि त्याने ते कोणाच्या मदतीने मिळवले, हा तपासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या संपूर्ण प्रकरणात अनेक धक्कादायक सत्य बाहेर येण्याची चिन्हे असून, पोलीस प्रशासन आता प्रत्येक मुद्द्याचा बारकाईने तपास करत आहे. या प्रकरणाच्या वाढत्या व्याप्तीमुळे संपूर्ण नाशिक शहरात संतापाची लाट उसळली असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे.

हे वाचलं का?