Govt Jobs : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मोठी भरती, पदवीधरांना सुवर्णसंधी; 'असा' करा अर्ज
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 4,500 रिक्त पदांसाठी अप्रेंटिस पदाची भरती झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची मुदत 12 जून ते 22 जून 2026 पर्यंत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
Govt Jobs : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मोठी भरती
पदवीधरांना सुवर्णसंधी
'असा' करा अर्ज
Government Jobs : सेंट्रल बँक ऑफ इंडियाने प्रशिक्षणार्थी (Apprentice) पदांची भरती जाहीर केली आहे. एकूण 4,500 रिक्त जागांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी 12 जूनपासून सुरू झाली असून, इच्छुकांना 22 जून 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी प्राप्त केलेले उमेदवार या सुवर्णसंधीचा लाभ घेऊ शकतात. या भरतीची ऑनलाईन परीक्षा जुलै 2026 च्या पहिल्या आठवड्यात घेतली जाण्याची शक्यता आहे.
'अशी' होणार भरती
या भरतीसाठी उमेदवारांची वयोमर्यादा 31 मे 2026 रोजी 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 12 महिन्यांच्या कालावधीसाठी प्रशिक्षण दिले जाईल आणि या प्रशिक्षण काळात दरमहा 15,000 रुपये विद्यावेतन (Stipend) दिले जाणार आहे. उमेदवारांची अंतिम निवड ही ऑनलाईन परीक्षा, स्थानिक भाषा चाचणी, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी या चार टप्प्यांच्या आधारे केली जाईल. उमेदवारांना centralbank.bank.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज सादर करावा लागेल.
हे ही वाचा : जालना: सावत्र बापाचं अमानुष कृत्य, पैशांच्या वादातून चिमुरड्याचे हात पाय बांधून..
'हे' उमेदवार पात्र नाहीत
या भरती प्रक्रियेत काही महत्त्वाचे नियम लागू करण्यात आले आहेत. ज्या उमेदवारांनी यापूर्वी कोणत्याही संस्थेत किंवा सेंट्रल बँकेत शिकाऊ उमेदवाराचे (Apprenticeship) प्रशिक्षण घेतले आहे किंवा सध्या ते घेत आहेत, त्यांना अर्ज करता येणार नाही. तसेच पदवी पूर्ण केल्यानंतर एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ प्रशिक्षण किंवा कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांनाही अपात्र ठरवण्यात आले आहे. याशिवाय, या भरतीमध्ये माजी सैनिक किंवा दिव्यांग माजी सैनिकांना कोणतेही आरक्षण दिलेले नाही आणि ते या पदासाठी पात्र असणार नाहीत.
हे ही वाचा : मुंबईची खबर : मीठी नदीची 80 टक्के स्वच्छता खरंच पूर्ण झाली का?
महाराष्ट्रात किती जागा?
देशभरातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या 4,500 जागा असून, महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी सर्वाधिक 586 जागा उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवार जिल्हावार उपलब्ध जागांची सविस्तर माहिती अधिकृत अधिसूचनेमध्ये पाहू शकतात. कमी वेळात अर्ज सादर करावयाचा असल्याने, पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता 22 जूनपूर्वी आपली नोंदणी पूर्ण करावी. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी centralbank.bank.in या वेबसाईटला भेट द्यावी.









