कल्याण : रॅपिडो बुक केली पण त्याने तरुणीला अंधाऱ्या ठिकाणी नेलं, अंतिप्रसंगाचा प्रयत्न, नागरिकांकडून चोप VIDEO
Kalyan Crime : तिचा आवाज ऐकून आसपासच्या परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. नागरिकांनी तरुणीकडून घडलेला प्रकार समजून घेताच संबंधित चालकाला ताब्यात घेतले. संतप्त जमावाने चालकाला चांगलाच चोप दिला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कल्याण : रॅपिडो बुक केली पण त्याने तरुणीला अंधाऱ्या ठिकाणी नेलं
अंतिप्रसंगाचा प्रयत्न, नागरिकांकडून चोप VIDEO
Kalyan Crime : कल्याण पश्चिमेतील सिंडिकेट परिसरात महिलांच्या सुरक्षिततेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. जीममध्ये जाण्यासाठी रॅपिडो मोटारसायकल सेवा बुक केलेल्या एका तरुणीला चालकाने चुकीच्या ठिकाणी नेलं. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी संबंधित चालकाला पकडून भररस्त्यात चोप दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर तरुणी सायंकाळच्या सुमारास जिमसाठी घराबाहेर पडली होती. तिने नेहमीप्रमाणे रॅपिडो अॅपद्वारे दुचाकी बुक केली. सुरुवातीला प्रवास सुरळीत सुरू होता. मात्र काही अंतर गेल्यानंतर चालकाने अचानक मार्ग बदलत जीमकडे न जाता कल्याण पश्चिमेतील पोलीस लाईन परिसरातील एका निर्जन आणि अंधाऱ्या ठिकाणी मोटारसायकल नेली. परिस्थिती संशयास्पद वाटताच तरुणीने चालकाला प्रश्न विचारले असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे देत तिची छेडछाड सुरू केल्याचा आरोप आहे.
याच दरम्यान चालकाने तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून तरुणीने घाबरून न जाता धैर्याने प्रतिकार केला. तिने स्वतःचा बचाव करत जोरात आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून आसपासच्या परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. नागरिकांनी तरुणीकडून घडलेला प्रकार समजून घेताच संबंधित चालकाला ताब्यात घेतले. संतप्त जमावाने चालकाला चांगलाच चोप दिला.
घटनेची माहिती मिळताच कल्याण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी जमावाकडून चालकाला ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात नेले. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून आरोपी चालकाविरोधात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.










