दुभाजकाला धडकल्याने कारने पेट घेतला, पोलीस निरीक्षकाचा जळून मृत्यू; दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ
Police inspector dies of burns : वाहन दुभाजकावर जाऊन आदळताच पेट्रोल टँक फुटल्यासारखा जोरदार स्फोट झाला आणि कारला क्षणार्धात आग लागली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दुभाजकाला धडकून कारने पेट घेतला
पोलीस निरीक्षकाचा जळून मृत्यू
दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ
धारवाड : गदग–हुबळी राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात हावेरी येथील पोलिस निरीक्षक पंचाक्षरी सालीमठ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुभाजकाला झालेल्या जोरदार धडकेनंतर त्यांच्या कारला अचानक आग लागली आणि काही क्षणांतच वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. कारचे दरवाजे जॅम झाल्याने त्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे ते आतच अडकले आणि जिवंत जळून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने पोलिस दलात आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंचाक्षरी सालीमठ हे गदग येथे कुटुंबीयांना भेटून पुन्हा कार्यस्थळी म्हणजेच हावेरीकडे जात होते. सायंकाळी ते हुबळीच्या दिशेने प्रवास करत असताना अन्नीगेरी तालुक्यातील भद्रापूरजवळ अपघात झाला. अरेरा पुलाजवळील वळणावर त्यांची कार अचानक नियंत्रणाबाहेर गेली. वाहन दुभाजकावर जाऊन आदळताच पेट्रोल टँक फुटल्यासारखा जोरदार स्फोट झाला आणि कारला क्षणार्धात आग लागली.
रस्त्यावरून गाड्या वेगाने धावत असतानाच हे सर्व काही काही क्षणांत घडले. सालीमठ यांच्या कारमध्ये आग पसरल्यावर ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होते, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र धडकेचा जोर आणि त्यानंतर कारचे दरवाजे जॅम झाल्यामुळे त्यांना मार्ग मिळाला नाही. आग अत्यंत झपाट्याने पसरल्याने कोणीही जवळ जाऊन मदत करण्यास धजावले नाहीत. काही वाहनचालकांनी तात्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाला कळविले. परंतु घटनास्थळी पोहोचेतोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती.
हेही वाचा : पुणे : जुन्नरमध्ये तीन कुत्र्यांनी मिळून बिबट्याला पिटाळून लावलं; पाहा व्हिडीओ










