रीलस्टार हॉटेल मालकीणीच्या आत्महत्येचं कारण काय? नेमकं काय घडलं?
Reels Star Rohini Paradhye suicide case : मंगळवेढा तालुक्यातील लोकप्रिय रीलस्टार रोहिणी पाराध्ये यांनी हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रेमविवाह आणि यशाच्या शिखरावर असलेल्या या रीलस्टारच्या निधनामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
रीलस्टार हॉटेल मालकीणीच्या आत्महत्येचं कारण काय?
नेमकं काय घडलं?
Reels Star Rohini Paradhye suicide case, नितीन शिंदे : मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील 'हॉटेल ग्रामपंचायत'च्या मालकीण आणि लोकप्रिय रीलस्टार रोहिणी पाराध्ये यांच्या आत्महत्येने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पती निलेश पाराध्ये यांच्यासोबत त्या या हॉटेलमध्ये वास्तव्यास होत्या. सोमवारी हॉटेलची साप्ताहिक सुट्टी असल्याने हॉटेल बंद होते, परंतु मंगळवारी हॉटेल उघडले गेले नाही. दुपारी एकच्या सुमारास रोहिणी यांनी हॉटेलच्या स्वयंपाकघरात गळफास घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली. त्यांना तातडीने मंगळवेढा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत रोहिणी यांचे सासरे विलास पाराध्ये यांनी या दुर्दैवी घटनेबाबत माहिती दिली आहे, तर पोलीस प्रशासनाने सध्या या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
हेही वाचा : पुणे : IT इंजिनिअर मुलीचे चप्पल विक्रेत्यासोबत प्रेमसंबंध.. शेवटी नदीपात्रात मृतदेह सापडला!
व्यवसाय विस्ताराचा तणाव आणि वैयक्तिक वादाची चर्चा
रोहिणी आणि निलेश यांचा प्रेमविवाह झाला होता आणि काही काळ पुण्यामध्ये वास्तव्यास असताना त्यांनी सोशल मीडियावर रील बनवण्यास सुरुवात केली. त्यांच्या रील आणि हॉटेलमधील खेळीमेळीच्या वातावरणातील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झाले होते. या लोकप्रियतेच्या जोरावर त्यांनी मंगळवेढा तालुक्यात दोन नवीन हॉटेल शाखा सुरू केल्या. मात्र, या नवीन शाखांचे व्यवस्थापन करणे, आर्थिक घडी नीट बसवणे आणि शाखा यशस्वीपणे चालवणे यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. या शाखांच्या विस्ताराच्या तणावातूनच त्यांच्यात वाद निर्माण झाले असावेत, अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे, रोहिणी यांचा निलेश यांच्यासोबतचा हा दुसरा विवाह असल्याचे समजते आहे. त्यामुळे प्रेमविवाहानंतर नक्की कोणत्या कारणाने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, दोघांमधील मतभेदांचे नेमके स्वरूप काय होते, की अन्य काही वेगळे कारण यामागे आहे, याबाबत विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
हेही वाचा : दुष्काळात तेरावा महिना, पुणेकरांच्या खिशाला कात्री, 'एवढ्या' रुपयांनी महागला CNG









