जालना : प्रसिद्ध कीर्तनकार दौलत महाराज सातपुते यांचा मृतदेह आढळला
Renowned Kirtankar Devendra Chaitanya Swami death Case alias Daulat Maharaj Satpute : जालन्यातील भोकरदन तालुक्यात प्रसिद्ध कीर्तनकार देवेंद्र चैतन्य स्वामी उर्फ दौलत महाराज सातपुते यांचा मठातील खोलीत मृतदेह आढळला. घटनास्थळावरून मोबाईल गायब असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
जालना : प्रसिद्ध कीर्तनकार दौलत महाराज सातपुते यांचा मृतदेह आढळला
घटनास्थळावरून मोबाईल गायब असून पोलिसांकडून तपास सुरू
Renowned Kirtankar Devendra Chaitanya Swami death Case alias Daulat Maharaj Satpute, जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. देवेंद्र चैतन्य स्वामी उर्फ दौलत महाराज सातपुते (वय 41) यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. सावंगी अवघडराव येथील प्राचीन पाताळेश्वर मंदिर परिसरातील त्यांच्या मठातील राहत्या खोलीत रविवारी (15 नोव्हेंबर) सकाळी ही घटना उघडकीस आली. शनिवारी रात्री गावात कीर्तन केल्यानंतर ते मठात परतले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे घटनास्थळावरून त्यांचा मोबाईल फोनही गायब असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यातील 'या' जिल्ह्यांत हुडहुडी भरणार, IMD चा अंदाज घ्या जाणून
गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला
देवेंद्र चैतन्य स्वामी हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील रहिवासी होते. मागील आठ ते दहा वर्षांपासून ते भोकरदन तालुक्यातील सावंगी अवघडराव येथील पाताळेश्वर मंदिर परिसरातील मठात वास्तव्यास होते. याच ठिकाणाहून ते धार्मिक कीर्तन, प्रवचन आणि समाजप्रबोधनाचे कार्य करीत होते. आपल्या कीर्तनातून ते तरुणांना व्यसनांपासून दूर राहण्याचा, आई-वडिलांची सेवा करण्याचा आणि राष्ट्रसेवेला प्राधान्य देण्याचा संदेश देत असत. तसेच शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना श्रीमद्भगवद्गीतेचे महत्त्व पटवून देत संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठीही ते प्रयत्नशील होते. शनिवारी रात्री सुमारे दहा वाजेपर्यंत त्यांचे गावात कीर्तन झाले. त्यानंतर ते नेहमीप्रमाणे मठात परतले होते.
हेही वाचा : राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या राजीनाम्याची घोषणा, वारसदारही केला घोषित
मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही
रविवारी सकाळी बराच वेळ होऊनही देवेंद्र चैतन्य स्वामी मंदिरात न आल्याने गावकऱ्यांनी त्यांच्या राहत्या खोलीत जाऊन पाहणी केली. त्यावेळी खोलीतील स्लॅबच्या कडीला भगव्या रंगाच्या रुमालाच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पारध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने घटनास्थळाची बारकाईने तपासणी करून आवश्यक पुरावे गोळा केले. दरम्यान, घटनास्थळावरून स्वामींचा मोबाईल फोन गायब असल्याचे समोर आले असून, त्याबाबतही पोलीस तपास करीत आहेत.
देवेंद्र चैतन्य स्वामी यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वालसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी पारध पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आणि तपासातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, स्वामींच्या निधनाचे वृत्त समजताच सावंगी अवघडरावसह भोकरदन आणि जालना परिसरातील भाविकांमध्ये शोककळा पसरली आहे. आजूबाजूच्या जिल्ह्यांतील भाविकांनाही या वृत्ताने धक्का बसला आहे. आपल्या ओघवत्या वाणीने आणि प्रभावी कीर्तनातून अनेकांना आध्यात्मिक दिशा देणाऱ्या देवेंद्र चैतन्य स्वामी यांच्या निधनाने धार्मिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
