शरद पवारांपेक्षा उद्धव ठाकरेंसमोर…; अजित पवार सुषमा अंधारेंवर भडकले
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे या शरद पवार यांच्यासमोर रडल्या. त्यांनी अजित पवारांची तक्रार केली. त्यावरून आता अजित पवारांनी त्यांना खडेबोल सुनावले आहेत.
ADVERTISEMENT

‘सर, सभागृहात विरोधी पक्षनेत्यांनी प्रश्न विचारायला हवा होता’, असं म्हणत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर रडल्या. सुषमा अंधारेंनी थेट अजित पवार यांची तक्रारच पवारांकडे केली. पण, या प्रकारामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार संतापले. अजित पवारांनी सुषमा अधारेंना स्पष्टच शब्दात सुनावलं.
भारतीय भटके-विमुक्त विकास संशोधन संस्थेमार्फत फुले-आंबेडकर साहित्य पुरस्कार प्रदान सोहळ्यात बोलताना सुषमा अंधारेंनी ही तक्रार केली. यावर अजित पवारांना पुण्यात प्रश्न विचारण्यात आला. अजित पवारांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत खडेबोल सुनावले.
सुषमा अंधारे रडल्या, अजित पवार म्हणतात…
अजित पवार या घटनेवर बोलताना म्हणाले, “सुषमा अंधारे कुठल्या पक्षात आहेत. शिवसेना ठाकरे गटात. विरोधी पक्षाचे नेते विधान परिषदेचे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे अंबादास दानवे आहेत ना? आहेत ना. मग तिथे शरद पवार यांच्यासमोर रडण्यापेक्षा, तिथं भावनिक होण्यापेक्षा त्या ज्या पक्षाचं काम बघताहेत. ज्या पक्षाकरता बाबा रे, काका रे, मामा रे करताहेत आणि सभा घेताहेत.”
हेही वाचा >> ‘नाना पटोलेंनी राजीनामा द्यायला नको होता’, अजित पवारांनी सांगितली चूक
“त्यांनी अजित पवारचा उल्लेख करण्यापेक्षा त्या ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाच्या विरोधी पक्षनेत्याला सांगायला पाहिजे. विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याला जेव्हढा अधिकार आहे, तितकाच अधिकार विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याला आहे. त्यांना सांगा, तिथं रडण्यापेक्षा तुम्ही उद्धव ठाकरेंकडे रडला असता अन् अंबादास दानवेंना तो मुद्दा उपस्थित करायला सांगितलं असतं, तर जास्त योग्य ठरलं असतं”, असे खडेबोल अजित पवारांनी सुषमा अंधारे यांना सुनावले.