26 वर्षांचा नजीर गेला कुलरमध्ये पाणी टाकायला, पुढच्या क्षणी गाठलं मृत्यूनं!
Beed Youth Death due to cooler: कुलरमध्ये पाणी टाकताना विजेचा शॉक लागल्याने बीडमधील २६ वर्षीय नजीर सय्यद या युवकाचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे.
ADVERTISEMENT

रोहिदास हातागळे, बीड: उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर घरातील कुलरमध्ये पाणी टाकत असताना विजेचा शॉक लागून एका 26 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी घाटनांदूर येथे घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, नजीर खदीर सय्यद (वय 26) हा युवक बांधकाम मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मंगळवारी (5 मे) सकाळी साडेआठच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे कामावर जाण्याची तयारी करत होता. त्यावेळी घरातील लोखंडी कुलरमध्ये पाणी टाकत असताना अचानक कुलरमध्ये विजेचा प्रवाह उतरला आणि त्याला तीव्र शॉक बसला. शॉक लागल्याने तो जागीच खाली कोसळला.
हे ही वाचा>> जनरेटरचं डिझेल तपासण्यास गेली महिला, पंख्यात ओढणी अडकल्याने गळफास बसला, महिलेवर काळाचा घाला
घटनेचा आवाज ऐकून घरातील पत्नी व वडील धावून आले. त्यांनी तातडीने वीजपुरवठा बंद करून नजीरला बाहेर काढले. तत्काळ त्याला घाटनांदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे हलविण्याचा सल्ला दिला.
अंबाजोगाई येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी नजीरला मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे सय्यद कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नजीरच्या पश्चात पत्नी, अवघ्या आठ महिन्यांची चिमुकली मुलगी आणि वृद्ध आई-वडील असा परिवार असून, कुटुंबाचा आधारस्तंभ हरपल्याने त्यांच्यावर उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.









