“भाजपवाले कुठेय… ते सतरंजीखाली गेलेत”, ठाकरे भाजपच्या निष्ठावंतांबद्दल काय बोलले?
अमरावती व अकोल्याच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. ठाकरेंनी भाजपला चिमटे काढले आणि भाजप-आरएसएसच्या कार्यकर्त्यांची सतरंजी करून टाकलीये, असं म्हणत निष्ठावंतांना गोंजारण्याचा प्रयत्न केला. ठाकरे नेमकं काय म्हणाले?
ADVERTISEMENT

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर जशी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस बांधायला घेतली, तसे उद्धव ठाकरेही मैदानात उतरलेत. उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी अमरावती व अकोल्याच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. ठाकरेंनी भाजपला चिमटे काढले आणि भाजप-आरएसएसच्या कार्यकर्त्यांची सतरंजी करून टाकलीये, असं म्हणत निष्ठावंतांना गोंजारण्याचा प्रयत्न केला. ठाकरे नेमकं काय म्हणाले, तेच पाहुयात…
अमरावतीत शिवसेनेचा (युबीटी) कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी ठाकरे म्हणाले, “माझ्यावर टीका करतात की मी घरी बसून होतो. मी घरी होतो पण, मी कुणाची घरं फोडली नाही. घरफोडे तुम्ही आहात. तुम्हीही म्हणाल की, घरी बसून काम केलं, हो केलं. पण, तुम्हाला घरं फोडूनही ते काम करता येत नाहीये. म्हणून तुम्हाला दारोदारी जावं लागतं आहे. अंगणवाडी सेविकांना साध्या गणवेशात बसायला सांगितलं जात आहे. ही वेळ का आली?”, असा सवाल करत ठाकरेंनी राज्यात सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावरून भाजपला टीकास्त्र डागलं.
…तर तुम्हाला आमदार विकत घ्यावे लागणार नाही -ठाकरे
पुढे ठाकरे असंही म्हणाले की, “मेळघाटात कुपोषण होतंय, तसंच ठाण्यातील जव्हारवाड्यात मी गेलेलो आहे. मी सरकारला दोष देत बसलो नाही. शिवसेनेने त्यांना महिनाभर पुरेल इतक्या पाण्याच्या बाटल्या आणि दुधाची भुकटी दिली. आज तुमच्याकडे खोके पडलेत. तुम्हाला माणसं विकत घेता येताहेत. तुम्ही आमदार विकत घेता आहात, पण त्याच पैशातून ही माणसं वाचवा ना. ती वाचवली तर त्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला कुणाला विकत घ्यावं लागणार नाही. मतं सुद्धा विकत घ्यावी लागणार नाही.”
Explainer : शरद पवारांनी ‘हुकुमी पत्ते’ केले ओपन, आता भुजबळांसाठी लढाई अवघड?
“कामच करायचं नाही. फक्त हे फोड, ते फोड. मग हा जगातील सर्वात मोठा पक्ष. जगात क्रमांक एकवर आपले पंतप्रधान असतानाही तुम्हाला पक्ष फोडण्याची गरज का वाटते? शिवसेना फोडली, चोरताय. राष्ट्रवादी फोडली. दुसऱ्याचं चोरून घ्यायचं. भाजपवर ही वेळ का आली? मस्ती आणि आत्मविश्वास हे दोन शब्द महत्त्वाचे आहेत. भाजपला सत्तेची मस्ती आलीये, पण त्यांच्याकडे आत्मविश्वास नाही”, असा टोलाही ठाकरेंनी नरेंद्र मोदींना लगावला.