बोगस प्रतिज्ञापत्र प्रकरणी पोलीस पोहोचले चार जिल्ह्यांत, तपासात आतापर्यंत काय सापडलं?

Maharashtra fake affidavits case : मुंबईतल्या वांद्रे परिसरात बोगस प्रतिज्ञापत्र जप्त करण्यात आली. या प्रकरणात गुन्हे शाखा तपास करत असून, पथकं कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, पालघर जिल्ह्यात.
बोगस प्रतिज्ञापत्र प्रकरणी पोलीस पोहोचले चार जिल्ह्यांत, तपासात आतापर्यंत काय सापडलं?

मुंबईतल्या वांद्रे न्यायालय परिसरात बोगस प्रतिज्ञापत्र आढळून आली. चार हजारांहून अधिक असलेली ही प्रतिज्ञापत्रं ठाकरे गटाकडून केली जात असल्याचा आरोप शिंदे गटाने केला. या प्रकरणात आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपास सुरू केला असून, चार पथकं चार जिल्ह्यांत पोहोचली आहेत.

शिंदे गट आणि ठाकरे गटाने शिवसेनेवर दावा केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने कागदपत्रं मागवली होती. दोन्ही गटांकडून पाठिंबा असलेल्या पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आली. दरम्यान, ८ ऑक्टोबर रोजी वांद्रे न्यायालय परिसरात एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात नोटरीचं काम चालू होतं. याची माहिती तक्रारदाराने पोलिसांना दिली.

मुंबई पोलिसांच्या निर्मल नगर पोलिसांनी सर्व प्रतिज्ञापत्र जप्त केली. ४ हजार ६२२ प्रतिज्ञापत्र जप्त करण्यात आल्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा ८ कडे देण्यात आला. पोलिसांकडून तपास सुरू असून, पोलिसांची पथकं तपासासाठी नाशिक, पालघर, कोल्हापूर आणि अहमदनगर जिल्ह्यात पोहोचली आहेत.

बोगस प्रतिज्ञापत्र प्रकरणात पोलिसांनी काय सांगितलं?

बोगस प्रतिज्ञापत्र प्रकरणाच्या तपासासंदर्भात गुन्हे शाखा ८ चे पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड यांनी माहिती दिली. बोलमवाड म्हणाले, "बॉन्ड पेपरवर नोटरी करणाऱ्याची चौकशी करण्यात आली. त्याने व्यवस्थित उत्तर दिलं नाही. सध्या हे प्रतिज्ञापत्र बोगस आहेत की खरे आहेत, याची पडताळणी गुन्हे शाखेची चार पथकं करत आहे. महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर आणि पालघर जिल्ह्यात पथकं गेली आहेत. ज्या व्यक्तींच्या नावे शपथपत्र आहे, त्या व्यक्तींकडून उलटतपासणी केली जात जाईल आणि पुढे तपास केला जाईल", अशी माहिती बोलमवाड यांनी दिली.

प्रतिज्ञापत्रावर असणाऱ्या व्यक्तीची भेट, प्रत्येक प्रतिज्ञापत्राची होणार पडताळणी

"या प्रकरणात आतापर्यंत कुणालाही अटक करण्यात आलेली नाहीये. सर्वात आधी प्रतिज्ञापत्र बोगस आहेत की, खरे आहे या दिशेनं तपास सुरू आहे. ४,६२२ प्रतिज्ञापत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढची कारवाई केली जाईल. आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या तपासात कोणत्याही मोठ्या नेत्याचं नाव समोर आलेलं नाही. पण, तपास पूर्ण झाल्यानंतर याबद्दलची सर्व माहिती दिली जाईल", असंही बोलमवाड यांनी सांगितलं.

बोगस प्रतिज्ञापत्रावरून ठाकरे-शिंदे गटात आरोप प्रत्यारोप

वांद्रेत सापडलेल्या बोगस प्रतिज्ञापत्रांवरून शिंदे गटाने ठाकरे गटावर आरोप केलेले आहेत. शिवसैनिकांची बोगस प्रतिज्ञापत्र ठाकरे गटाने तयार केल्याचं शिंदे गटाचे नरेश म्हस्केंनी म्हटलं होतं. विशेष म्हणजे यामागे मातोश्री असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे. तर आम्ही जी प्रतिज्ञापत्र द्यायची होती, ती दिलीये. बोगस प्रतिज्ञापत्रांशी संबंध नसल्याचं ठाकरे गटाचे अनिल देसाईंनी म्हटलं होतं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in