Saif Ali Khan हल्ला: आता थेट आंतरराष्ट्रीय कटाचा संशय, कोर्टानेच...
Saif Ali Khan Attacker: सैफ अली खान याच्या हल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला कोर्टात हजर करण्यात आलं. ज्यानंतर कोर्टाने थेट म्हटलं आहे की, हा हल्ला आंतरराष्ट्रीय कटाचा भाग देखील असू शकतो.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सैफ अली खानच्या मारेकऱ्याला अखेर पोलिसांनी केलं अटक
पोलिसांनी आरोपीला अटक करून कोर्टात हजर केलं
कोर्टाने व्यक्त केला आंतरराष्ट्रीय कटाचा संशय
मुंबई: अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला रविवारी (19 जानेवारी) दुपारी मुंबई पोलिसांनी मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर केले. दंडाधिकाऱ्यांनी आरोपीला त्याचे नाव विचारले आणि त्याची काही तक्रार आहे का? असे विचारले. जेव्हा पोलिसांनी आरोपीच्या डोक्यावरील कव्हर काढला तेव्हा त्याने दंडाधिकाऱ्यांना त्याचे नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असल्याचे सांगितले. सरकारी वकिलांनी आरोपीसाठी दंडाधिकाऱ्यांकडे 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली, ज्याला बचाव पक्षाने विरोध केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर दंडाधिकाऱ्यांनी आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीच्या कोठडीवरून मॅजिस्ट्रेट कोर्टात सरकारी वकील आणि बचाव पक्षात जोरदार युक्तिवाद झाला.
जेव्हा दंडाधिकाऱ्यांनी आरोपीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणी वकील आहे का असे विचारले तेव्हा एका वकिलाने पुढे येऊन पोलिसांवर आरोपीशी बोलू न देण्याचा आरोप केला. दुसरा वकील पुढे आला आणि त्याने मॅजिस्ट्रेटला सांगितले की, तो लीगल अॅडचा आहे आणि आरोपीचे प्रतिनिधित्व करेल. दंडाधिकाऱ्यांनी सांगितले की, तुम्ही दोघेही आरोपीचे प्रतिनिधित्व करू शकता, ज्यावर दोन्ही वकिलांनी सहमती दर्शवली.
हे ही वाचा>> Saif Ali Khan वर चाकूने हल्ला करणारा बांगलादेशी? पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती
मुंबई पोलिसांच्या तपास अधिकाऱ्यांनी दंडाधिकाऱ्यांना सांगितले -
आरोपीने बेकायदेशीरपणे सैफ अली खानच्या घरात प्रवेश केला आणि अभिनेता आणि इतर दोघांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सैफवर 6 वेळा चाकूने वार करण्यात आले आणि त्याला गंभीर दुखापत झाली. आरोपी अभिनेत्याच्या घरात कसा आणि कोणत्या कारणांसाठी घुसला हे पोलिसांना शोधून काढावे लागेल. या घटनेत आणखी कोणी सहभागी आहे का?
तपास अधिकाऱ्याने दंडाधिकाऱ्यांसमोर युक्तिवाद केला की आरोपी बांगलादेशी आहे आणि वैध कागदपत्रांशिवाय तो भारतात कसा आला हे शोधणे आवश्यक आहे. हल्ल्यात चाकूचे तीन तुकडे झाले; एक सैफ अली खानच्या शरीरातून, एक गुन्ह्याच्या ठिकाणी सापडला, तिसरा तुकडा आरोपीकडे आहे आणि तो आपल्याला पुरावा म्हणून परत मिळवायचा आहे. त्यामुळे पोलिसांना आरोपीची 14 दिवसांची कोठडी हवी आहे.









