डेटिंग अॅपवर भेट, 3 दिवस कारमध्ये ठेवला मृतदेह; ‘त्या’ हत्येची Inside Story
Delhi crime news : 11 ऑक्टोबर रोजी स्वित्झर्लंडहून दिल्लीत आलेल्या महिलेची तिच्या बॉयफ्रेंडने हत्या केली. आरोपी गुरप्रीतने महिलेला हॉटेलबाहेर बोलावून विष्णू गार्डन नेले. तिथे गेल्यानंतर गुरप्रीतने तिचा गळा दाबून खून केला.
ADVERTISEMENT

Delhi crime Swiss women murder : दिल्लीतील टिळक नगरमध्ये एका परदेशी महिलेच्या हत्येची कहाणी अंगाचा थरकाप उडवणारी आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, गुरप्रीत सिंग असे त्याचे नाव आहे. तो दिल्लीतील जनकपुरी येथील रहिवासी आहे. गुरप्रीतने पोलिसांना सांगितले की, त्याने काही वर्षांपूर्वी एका डेटिंग अॅपद्वारे मयत महिलेशी मैत्री केली होती. यानंतर तो तिच्याशी बोलू लागला आणि भेटू लागला. त्यानेच महिलेला स्वित्झर्लंडहून भारतात बोलावले होते.
आरोपीने सांगितले की, महिला दिल्लीत आल्यानंतर तिच्यासोबत फोनवरुन बोलत होतो. चार महिन्यांसाठी महिलेला भेटण्यासाठी तो स्वित्झर्लंडलाही गेला होता. गुरप्रीतने सांगितले की, महिलेचे इतर लोकांशीही संबंध असल्याचा संशय होता. यामुळे तो संतापला होता.
11 ऑक्टोबर रोजी ही महिला स्वित्झर्लंडहून दिल्लीत आली आणि पश्चिम दिल्लीतील एका हॉटेलमध्ये थांबली. गुरप्रीतने महिलेला हॉटेलबाहेर बोलावून विष्णू गार्डन परिसरात नेले. महिलेला तिथे नेण्यापूर्वी त्याने महिलेला सांगितले की सरप्राईज करायचे आहे. तिथे गेल्यानंतर गुरप्रीतने तिचा गळा दाबून खून केला.
दुर्गंधी येऊ लागल्यावर महापालिका शाळेजवळ टाकला मृतदेह
आरोपी गुरप्रीतने महिलेचे हात पाय साखळदंडाने बांधले होते. हत्येनंतर मृतदेह गाडीत ठेवला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जागेच्या शोधात तो परिसरात फिरत राहिला. सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत, असे वाटल्याने तो पकडला जाऊ नये, म्हणून त्याने घराजवळ कार उभी केली आणि मृतदेह कारमध्ये टाकून दिला. जेव्हा दुर्गंधी येऊ लागली तेव्हा त्याने हत्येनंतर दोन दिवसांनी मृतदेह महापालिकेच्या शाळेजवळ फेकून दिला.