धर्म बदलून ज्योती मल्होत्राने पाकिस्तानी अधिकाऱ्याशी लग्न केलेलं? पोलिसांनी सांगितलं सत्य!
Jyoti Malhotra Youtuber: पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या ज्योती मल्होत्रा हिच्याविषयी नवनवीन माहिती समोर येत आहे. दरम्यान, हिसार पोलिसांनी आता ज्योतीबाबत एक नवी माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT

Jyoti Malhotra Pakistan: नवी दिल्ली: पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असलेल्या ज्योती मल्होत्राच्या प्रकरणात दररोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. ज्योतीने आपली खरी ओळख लपवून धर्मांतर केले होते का? तिने इस्लाम धर्म स्वीकारून आणि पाकिस्तानी अधिकाऱ्याशी लग्न केले होते का? असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहे. आता पोलिसांनी सोशल मीडियावर सुरू असलेल्या अशा सर्व दाव्यांना स्पष्ट उत्तर देऊन एक मोठी अपडेट दिली आहे.
पोलिसांचे म्हणणे आहे की, आतापर्यंतच्या तपासात ज्योतीचे धर्मांतर, लग्न किंवा कोणत्याही दहशतवादी नेटवर्कशी संबंध याबद्दल काहीही सिद्ध झालेले नाही. ज्योती अजूनही हिसार पोलिसांच्या ताब्यात आहे आणि तिचा पाच दिवसांचा रिमांड आज (22 मे) संपत आहे. या काळात, पोलिसांनी तिचा फोन, लॅपटॉप, बँक खाती आणि डिजिटल ट्रेस तपासण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, परंतु अद्याप कोणतेही निर्णायक पुरावे सापडलेले नाहीत.
हे ही वाचा>> चेहरा भोळा अन्... ज्योती मल्होत्राने कबूल केलं 'ते' सत्य, हादरवून टाकणारी कहाणी!
एका तपास अधिकाऱ्याने सांगितले की, 'आतापर्यंतच्या तपासात ज्योतीच्या धर्मांतराचा कोणताही पुरावा सापडलेला नाही किंवा पाकिस्तानी अधिकाऱ्याशी झालेल्या तिच्या लग्नाबद्दल काहीही समोर आलेले नाही. ही पूर्णपणे अफवा आणि निव्वळ अंदाज आहे.'
डिजिटल उपकरणाच्या फॉरेन्सिक अहवालाकडे डोळे
हिसार पोलिसांनी सांगितले की, आतापर्यंत ज्योती मल्होत्राच्या मोबाइल फोन, लॅपटॉप आणि इतर डिजिटल उपकरणांचा डेटा शोधला जात आहे. परंतु या उपकरणांमधून कोणत्याही प्रकारची लष्करी माहिती, गुप्त कागदपत्रे किंवा धोरणात्मक माहिती लीक झाल्याचे कोणतेही स्पष्ट पुरावे नाहीत.
फॉरेन्सिक लॅबच्या अहवालांची प्रतीक्षा आहे आणि या अहवालांवरून आरोपीच्या कारवायांची व्याप्ती निश्चित होईल. व्हॉट्सअॅप चॅटबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. अशा परिस्थितीत, ज्योतीच्या चॅट हिस्ट्रीमध्ये असे काही संकेत मिळण्याची शक्यता आहे की, जे पुढील तपासाची दिशा ठरवतील.
हे ही वाचा>> 'मी लवकरच येईल..Love You कुश मुश', ज्योती मल्होत्राने टाकला 'लेटरबॉम्ब', पोलिसांना सापडली खतरनाक डायरी
सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांचे लक्ष आता ज्योतीच्या ऑनलाइन गोष्टी, संपर्क सूत्र आणि डिजिटल फूटप्रिंट्सवर आहे. तिचे सोशल मीडिया अकाउंट्स, ईमेल कम्युनिकेशन्स आणि इन्स्टंट मेसेजिंग अॅप्सद्वारे, तिने कधी, कुठे आणि कोणत्या माध्यमातून पाकिस्तान इंटेलिजेंसशी संपर्क साधला हे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
हिसार पोलिसांचे म्हणणे आहे की, ज्योतीच्या फोन आणि लॅपटॉपमधून आतापर्यंत असा कोणताही डेटा सापडलेला नाही, जो सिद्ध करू शकेल की तिने अत्यंत गोपनीय अशी देशाची लष्करी किंवा धोरणात्मक माहिती मिळवली होती.
चार बँक खात्यांची चौकशी सुरू
तपासात असे दिसून आले आहे की, ज्योती मल्होत्राची चार वेगवेगळी बँक खाती आहेत, ज्यांच्या व्यवहारांची बारकाईने चौकशी केली जात आहे. तिला पाकिस्तान इंटेलिजेंसकडून काही आर्थिक मदत मिळाली की नाही हे पोलिसांना जाणून घ्यायचे आहे. आतापर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, या खात्यांमध्ये कोणतेही संशयास्पद व्यवहार आढळलेले नाहीत, परंतु व्यवहारांच्या मुळाशी जाण्यासाठी FSL (फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी) आणि बँकिंग तज्ञांची मदत घेतली जात आहे. हे देखील शक्य आहे की, काही डिजिटल वॉलेट, क्रिप्टोकरन्सी किंवा मनी ट्रान्सफर अॅप्स वापरले गेले असतील, ज्याची सध्या तांत्रिक एजन्सींकडून चौकशी सुरू आहे.
पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संपर्क, पण दहशतवादी संबंध नाहीत
हिसार पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की, ज्योती निश्चितच पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या संपर्कात होती, परंतु तिने कोणत्याही दहशतवादी संघटनेत किंवा दहशतवादी कारवायांमध्ये थेट भाग घेतला नव्हता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, भारतातील कोणत्याही दहशतवादी कटात तिचा सहभाग असल्याचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. धर्मांतर किंवा पाकिस्तानी अधिकाऱ्याशी लग्न करण्याबाबतचे निव्वळ अंदाज वर्तवले जात आहेत. ज्याला कोणताही आधार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. सध्या या बाबींबाबत कोणतेही तथ्य समोर आलेले नाही.
पोलिसांचं म्हणणं काय?
हिसार पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत तपासात असे काहीही आढळले नाही जे सिद्ध करू शकेल की आरोपी ज्योतीने भारताच्या सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित कोणतीही संवेदनशील किंवा धोरणात्मक माहिती शेअर केली आहे. तरीही तपास सुरू आहे आणि सर्व पैलू तपासले जात आहेत.