चार वर्षीय चिमुरडीवर शाळेत लैंगिक अत्याचार, आरोपी नेमका कोण?
एका चार वर्षीय चिमुरडीवर शाळेच्या शौचालयात नेऊन लैंगिक अत्याचार करण्यात आला. या घटनेची माहिती कळताच शेकडो लोक शाळेत जमा झाले. राजस्थानमधील ही घटना नेमकी काय आहे, जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
चार वर्षीय चिमुरडीवर शाळेत लैंगिक अत्याचार
आरोपी नेमका कोण?
Crime News : एका चार वर्षीय निष्पाप शाळकरी चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच संपूर्ण शहरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. सोमवारी (27 जुलै) शाळेतून घरी परतल्यानंतर या चिमुरडीने तिच्या आईला शाळेतील शौचालयात एका व्यक्तीने तिच्यासोबत गैरकृत्य केल्याचे आणि तिला पकडण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. याशिवाय पीडितेने शरीरात त्रास होत असल्याची तक्रार केल्याने पालकांनी तिला तातडीने एका खासगी रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीनंतर लैंगिक शोषणाची शक्यता व्यक्त केली. राजस्थानमधील मकराना परिसरातील ही घटना आहे.
शाळेबाहेर शेकडो नागरिकांची गर्दी
रुग्णालयातील तपासणीनंतर पीडित मुलीचे नातेवाईक तात्काळ परबतसर पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी अधिकृत तक्रार दाखल केली. मंगळवारी रात्री ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच शेकडो नागरिकांनी शाळेबाहेर एकत्र येत आरोपीच्या तात्काळ अटकेच्या मागणीसाठी पूर्ण रात्र धरणे आंदोलन केले. यादरम्यान संतप्त लोकांनी काही काळ रस्ता रोखून धरला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक विक्की नागपाल आणि मकराना पोलीस ठाण्याचे प्रभारी पंकज कुमार फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आंदोलकांची समजूत काढून रस्ता मोकळा केला, मात्र नागरिक रात्रभर आंदोलनावर ठाम राहिले.
हे ही वाचा : ‘तुम्ही मला कधीच परकं मानलं नाही…’, ‘ती’ घोषणा करत अजिंक्य रहाणेला रडूच कोसळलं!
...तर आरोपी ताब्यात असता
या आंदोलनात माजी आमदार श्रीराम भिंचर हेदेखील सहभागी झाले होते. त्यांनी पोलीस प्रशासनाच्या कारभारावर तीव्र ताशेरे ओढत पोलिसांवर गंभीर हलगर्जीपणाचा आरोप केला. पीडित कुटुंब सकाळीच पोलीस ठाण्यात पोहोचले असतानाही अत्यंत संवेदनशील अशा घटनेत मुलीची वैद्यकीय तपासणी थेट रात्री 11 नंतर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. वेळेवर कारवाई झाली असती तर आरोपी आतापर्यंत पोलिसांच्या ताब्यात असता, असा सवाल उपस्थित करत मुख्य आरोपीला अटक होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा माजी आमदारांनी दिला.
हे ही वाचा : लेक 40 दिवसांनी आला, मिठी मारत रडले, धमक्या, भीती सांगितली, अभिजीतलाही रडू आलं
आरोपीचा शोध अजूनही सुरु
दरम्यान, पोलीस उपअधीक्षक विक्की नागपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित पक्षाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असून वैद्यकीय अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. घटनेनंतर मकराना शहरात तणावपूर्ण वातावरण असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, तर पोलीस निष्पक्ष तपास करत असून लवकरच आरोपीला गजाआड केले जाईल, असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले आहे.
