एक कोटी, नेपाळचा माफिया आणि मुंबईत ‘डील’! संजीव जीवा हत्येची स्टोरी
शूटर विजय यादव हा लखनौमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजनेअंतर्गत पाईपलाईन टाकणाऱ्या एका खासगी कंपनीत 2 महिन्यांपासून काम करत होता. 11 मे रोजी तो घरी गेला होता.
ADVERTISEMENT

Sanjeev Jeeva murder Update : न्यायालयात सुनावणी होते आणि नंतर निकाल येतो. पण, लखनौ न्यायालयात जे घडलं त्याने पुन्हा एकदा उत्तर प्रदेशतीला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला. पश्चिम उत्तर प्रदेशातील कुख्यात माफिया आणि मुख्तार अन्सारीचा निकटवर्तीय संजीव जीवा माहेश्वरी याची राजधानी लखनऊमध्ये भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आता याप्रकरणी नवीन माहिती समोर आलीये. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजीवला मारण्याचा सौदा मुंबईत झाला होता. मुंबईतच शूटर विजय यादवला आधीच मोठी रक्कम देण्यात आली होती. (sanjeev jeeva murder connection to mumbai)
मुंबईत कट रचून आरोपी विजय यादव उत्तर प्रदेशला पोहोचला, तेव्हा त्याला बहराइचमधील एका अज्ञात व्यक्तीने मॅग्नम रिव्हॉल्व्हर दिले. विजय यादवने तुरुंगात जाण्यापूर्वी प्राथमिक चौकशीत या गोष्टींची कबुली दिली आहे. पैशासाठी संजीव जीवाची हत्या केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. या हत्येमध्ये एक कोटींहून अधिकचा सौदा झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हत्येतील आरोपी विजय यादव याला मुंबईत आगाऊ पैसे दिले गेले होते.
शूटर विजय यादव काही दिवसांपूर्वी गेला होता नेपाळला
संजीव जीवा हत्या प्रकरणातील शूटर विजय यादवचे नेपाळ कनेक्शन समोर आले आहे. विजय यादव काही दिवसांपूर्वी नेपाळला गेला होता, तिथे तो नेपाळच्या बड्या माफियांच्या संपर्कात होता. नेपाळमधूनच विजय यादवला सुपारी मिळाल्याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. विजय यादवचा मोबाईल पोलिसांच्या ताब्यात आहे. मोबाईलमधील माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. विजयच्या मोबाईलमधील माहितीतून हत्येचे गूढ उलगडू शकते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
विजय यादवने लखनौमधील एससी-एसटी कोर्टरूममध्ये मुख्तार अन्सारीच्या जवळचा गँगस्टर संजीव माहेश्वरी जीवा याची हत्या केली. यावेळी न्यायालयाच्या दालनात एकच गोंधळ उडाला होता. घटनेदरम्यान न्यायाधीशांसह वकिलांनी टेबलाचा आधार घेत स्वत:चा जीव वाचवला. सर्वजण घाबरून इकडे तिकडे धावू लागले. त्यानंतर न्यायाधीश त्यांच्या खोलीत गेले होते.