15 मुलींना चुकीचा स्पर्श, अश्लील मेसेज पाठवले, स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचं कृत्य; पोलीस तपास सुरु होताच पळ काढला
आश्रम चालवणाऱ्या बाबाने 15 मुलींना चुकीचा स्पर्श करत त्यांची छेड काढल्याचा प्रकार समोर आलाय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

स्वामी चैतन्यानंद सरस्वतीने मुलींची छेड काढल्याचा आरोप

पोलीस तपास सुरु होताच स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार
Swami Chaitanyananda Saraswati : दिल्लीतील वसंतकुंज भागात आश्रम चालवणाऱ्या स्वामी चैतन्यानंद सरस्वती याने 15 मुलींची छेडछाड केल्याचा प्रकार समोर आलाय. शिवाय या बाबाने सर्व मुलींना अश्लील मेसेज देखील पाठवले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु करण्यात आलाय. दरम्यान, पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केल्यानंतर स्वामी चैतन्यानंद सरस्वती याने पळ काढलाय. फरार झालेल्या स्वामी चैतन्यानंद सरस्वतीला शोधण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहेत.
अधिकची माहिती अशी की, चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थसारथी असं मुलींची छेड काढणाऱ्या बाबाचं नाव आहे. त्याच्या Volvo कारला देखील बनावट 39 UN 1 नंबरप्लेट लावण्यात आली आहे. त्याची गाडी आता पोलिसांनी जप्त केली आहे. प्रकरण समोर आल्यानंतर आश्रम प्रशासनाने आरोपीला पदावरून हटवले आहे. आरोपी चैतन्यानंद सरस्वतीचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत. सध्या, आरोपीचं शेवटचं लोकेशन आग्रा दाखवत असल्याने उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने त्याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, पीडित मुलींचा जबाब पोलिसांकडून नोंदवण्यात आलाय.
EWS शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थीनींकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप
दिल्ली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वसंतकुंज उत्तर पोलीस ठाण्यात 4 ऑगस्ट रोजी श्रीशृंगेरी मठाचे प्रशासक पी. ए. मुरली यांनी स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थसारथी याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. शारदा इंस्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंटमध्ये EWS शिष्यवृत्ती अंतर्गत PGDM (पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट) शिकणाऱ्या विद्यार्थिनींवर स्वामी चैतन्यानंद सरस्वती याने लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता.
लैंगिक अत्याचार प्रकरणात महिला प्राध्यापकांचाही सहभाग
चौकशीदरम्यान, 32 विद्यार्थिनींची जबाब नोंदवण्यात आलाय. त्यापैकी 15 जणींनी आरोपी चैतन्यानंद सरस्वती यांच्यावर शिवीगाळ करणे, अश्लील व्हॉट्सअॅप मेसेज करणे आणि चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला आहे. कॉलेजमधील महिला प्राध्यापकांवर आरोपी स्वामीने त्याच्या मागण्या मान्य करण्यासाठी दबाव आणला होता, असंही पीडित मुलींनी सांगितलंय. तपासादरम्यान पोलिसांना श्री शारदा इंस्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंटच्या बेसमेंटमध्ये एक Volvo कार सापडली आहे. दरम्यान, या कारला बनावट नंबर प्लेट लावण्यात आली असून ही गाडी कथित स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ डॉ. स्वामी पार्थसारथी वापरत होता. पोलिसांनी आरोपी स्वामीला चौकशीसाठी अनेक वेळा बोलावले, पण त्याने कधीही पोलिसांना सहकार्य केले नाही आणि सध्या तो फरार झाला आहे.