वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे बादलीत भरुन ठेवले, पोटचीच मुलं का झाली निष्ठुर?
मुलगा आणि मुलीने मिळून पेन्शनच्या हव्यासापोटी आपल्या वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे बादलीत भरुन ठेवले
पोटचीच मुलं का झाली निष्ठुर?
Crime News : पेन्शनच्या पैशांसाठी एका वृद्ध निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरलेला 47 वर्षीय मुलगा राहुल आणि 36 वर्षीय मुलगी प्रफुल्ला या दोघांना थेट फाशीची शिक्षा सुनावली आहे, तर हत्येच्या कटात सामील असलेल्या 65 वर्षीय पत्नी गंगाबाई हिला जन्मठेपेची शिक्षा दिली आहे. सुमारे सात वर्षांपूर्वी झालेल्या या क्रूर हत्याकांडात न्यायालयाने पुराव्यांच्या आधारे हा अत्यंत कठोर आणि मोठा निर्णय दिला असून, यामुळे संपूर्ण परिसरात पुन्हा एकदा या घटनेची चर्चा सुरू झाली आहे. तेलंगणातील मलकाजगिरी परिसरातील ही घटना आहे.
पेन्शनसाठी हत्या
घटनेची पार्श्वभूमी अशी आहे की, मृत मारुती सुतार (वय 70 वर्षे) हे रेल्वे विभागात मालगाडीचे चालक म्हणून कार्यरत होते. आरोग्याच्या कारणास्तव त्यांनी सन 2000 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली होती, त्यानंतर त्यांना दरमहा 30,000 रुपये पेन्शन मिळत असे आणि याच पैशांवर संपूर्ण घराचा उदरनिर्वाह चालत असे. मात्र, त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी या पेन्शनच्या पैशांवरून त्यांच्यावर जळत होते. याच पैशांच्या हव्यासापोटी आणि वादातून तिघांनी मिळून मारुती सुतार यांच्या हत्येचा अत्यंत क्रूर कट रचला आणि 16 ऑगस्ट 2019 रोजी त्यांची घरातच हत्या केली.
हे ही वाचा : तरुण घरात शिरला, मुलीला बाहेर काढलं अन् दरवाजा लावून आशा वर्करसोबत...
इंटरनेटवर सर्च करुन खून
तेलंगणा पोलिसांनी तपासादरम्यान या घटनेबाबत धक्कादायक खुलासे केले होते. मृत मारुती यांच्या मुलीने हत्येपूर्वी इंटरनेटवर खून कसा करावा आणि त्याचे पुरावे कसे नष्ट करावेत, याचे वेगवेगळे मार्ग शोधले होते. त्यानुसार तिघांनी मिळून धोतऱ्याची सुकलेली फळे आणून त्याची पावडर बनवली आणि दोन दिवस मारुती यांच्या जेवणात मिसळली. त्याचा परिणाम न झाल्याने, तिसऱ्या दिवशी पावडरीचा डोस वाढवला, ज्यामुळे मारुती बेशुद्ध झाले. त्यानंतर तिघांनी त्यांच्यावर चाकूने वार करून त्यांचा जीव घेतला. धक्कादायक बाब म्हणजे, मृतदेहाची विल्हेवाट लावता यावी म्हणून त्यांनी शरीराचे अनेक तुकडे केले आणि ते वेगवेगळ्या बादल्यांमध्ये भरून ठेवले. घराबाहेर सुरू असलेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमाच्या गर्दीमुळे त्यांना हे तुकडे बाहेर फेकता आले नाहीत.
हे ही वाचा : सैराटपेक्षाही भयंकर, पायात खिळे ठोकल्याचा आरोप; केवळ मुलीशी मैत्री केल्याने हत्या
दुर्गंधी सुटल्याने घरात प्रवेश
हत्या केल्यानंतर दोन दिवसांनी, म्हणजेच 18 ऑगस्ट 2019 रोजी घरातून प्रचंड दुर्गंधी सुटल्याने शेजाऱ्यांनी घरात प्रवेश केला. तेथे बादल्यांमध्ये मानवी शरीराचे तुकडे पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. गर्दी जमा होताच गंगाबाई आणि प्रफुल्ला या दोघी काहीतरी कारण सांगून घरातून पळून गेल्या. स्थानिक नागरिकांनी तातडीने मलकाजगिरी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी वेगाने तपासचक्र फिरवून 21 ऑगस्ट 2019 रोजी तिन्ही आरोपींना अटक केली आणि त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. मलकाजगिरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक सी. बी. सुमित यांनी सांगितले की, फॉरेन्सिक टीमने दिलेल्या महत्त्वपूर्ण तांत्रिक पुराव्यांमुळेच न्यायालयासमोर गुन्हा सिद्ध करणे शक्य झाले आणि नराधम आरोपींना त्यांच्या कर्माची योग्य ती शिक्षा मिळाली.









