बाप अन् सावत्र आईने अल्पवयीन मुलीसोबत केलं कांड, सगळं गुपचूप उरकलं, पण...
पहिल्या बायकोच्या मृत्यूनंतर अवघ्या 6 महिन्यांतच आरोपीने पिंकी नावाच्या महिलेशी दुसरे लग्न केले. या दुसऱ्या लग्नानंतरच घरातील वातावरण सातत्याने बिघडत गेले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बाप अन् सावत्र आईने अल्पवयीन मुलीसोबत केलं कांड,
सगळं गुपचूप उरकलं,
पण...
Crime News : एका जन्मदात्या बापाने आपल्या दुसऱ्या पत्नीसोबत मिळून बारावीत शिकणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे तर, या गुन्ह्याचा पुरावा मिटवण्यासाठी त्यांनी कोणालाही न सांगता अत्यंत गुप्तपणे मृतदेहावर अंत्यसंस्कारही उरकून घेतले. या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि खळबळ उडाली आहे. हे धक्कादायक प्रकरण उत्तर प्रदेशातील भावनपूर परिसरातील गोकुळधाम सोसायटीत घडले असून, आरोपी बापाचे नाव कपिल असे आहे.
हत्या करुन गुपचूप उरकले अंत्यसंस्कार
मिळालेल्या माहितीनुसार, कपिलचा विवाह 2009 मध्ये प्रीती नावाच्या महिलेशी झाला होता. या संसारातून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली. मात्र, 2017 मध्ये प्रीतीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर अवघ्या 6 महिन्यांतच कपिलने पिंकी नावाच्या महिलेशी दुसरे लग्न केले. या दुसऱ्या लग्नानंतर घरातील वातावरण सातत्याने बिघडत गेले. सावत्र आई आणि वडिलांकडून मुलीचा मानसिक व शारीरिक छळ सुरू झाला. अखेर सोमवारी (25 मे) रात्री कपिल आणि पिंकी या दोघांनी मिळून या 17 वर्षीय मुलीची गळा दाबून हत्या केली आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी कोणालाही थांगपत्ता लागू न देता मृतदेह गढमुक्तेश्वर येथे नेऊन त्यावर अंत्यसंस्कार करून टाकले.
हे ही वाचा : आई सारखं 'परदेसी बाबा'कडे जायची, मुलाला चीड आली अन्...
'हे लोक मला मारुन टाकतील'
या घटनेची माहिती मृत मुलीचे मामा भूपेंद्र शर्मा यांना मंगळवारी दुपारी फोनवरून मिळाली. मात्र, नातेवाईक मेरठला पोहोचेपर्यंत आरोपींनी अंत्यसंस्कार उरकले होते. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी तात्काळ पोलिसात धाव घेतली आणि पोलिसांकडे एक ऑडिओ क्लिप सुपूर्द केली. या ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये मृत मुलगी रडत रडत आपल्या मावशीला सांगत होती की, 'मला येथून घेऊन जा, नाहीतर हे लोक मला मारून टाकतील.' यावरून ती मुलगी गेल्या अनेक वर्षांपासून नरकयातना भोगत असल्याचे स्पष्ट झाले असून, तिच्या हत्येचा कट आधीच रचला गेला होता, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
हे ही वाचा : गावातल्या दुसऱ्या धर्मातील मुलावर जीव जडला, निष्पाप क्रांतीसोबत भयंकर घडलं!
आरोपी ताब्यात
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. भावनपूर पोलिसांनी पीडित मुलीचे मामा भूपेंद्र शर्मा यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपी बाप कपिल आणि सावत्र आई पिंकी यांनी आपला गुन्हा कबूल केला असून, पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) अत्यंत गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने समाजात अनेक गंभीर प्रश्न निर्माण केले असून, एक बाप स्वतःच्या मुलीशी एवढा क्रूर कसा वागू शकतो आणि मुलगी एवढ्या वर्षांपासून छळ सहन करत असताना आजूबाजूचे लोक गप्प का होते, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.









