"तुला भूतबाधा झालीये, उपचार कर नाहीतर कधीच मूल..." 17 वर्षीय तरुणीला घाबरवलं अन् नंतर बलात्कार...
पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला भूतबाधा झाल्याचं सांगून तिला घाबरवण्यात आलं आणि नंतर उपचाराच्या बहाण्याने तिच्यासोबत बलात्कार झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.

बातम्या हायलाइट

17 वर्षीय तरुणीला भूतबाधा झाल्याचं सांगितलं अन् ...

भूतबाधेच्या नावाखाली केला लैंगिक अत्याचार
Rape Case: पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये एक संतापजनक घटना घडल्याचं समोर आलं आहे. रिपोर्ट्सनुसार, विरारमध्ये एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत 2 व्यक्तींनी बलात्कार केला. आरोपींनी पीडितेला भूतबाधा झाल्याचं सांगून तिला घाबरवलं. त्यानंतर, पीडितेला त्यांच्या जाळ्यात अडकवल्याचं सांगण्यात येत आहे. संबंधित प्रकरणासंदर्भात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केल्याची माहिती आहे.
विरारच्या जीवदानी मंदिरात गेली होती...
पोलिसांच्या माहितीनुसार, प्रेम पाटील आणि करण पाटील अशी आरोपींची नावं समोर आली असून त्यांनी पीडितेला भूतबाधा झाल्याचं सांगितलं आणि तिला घाबरवण्याचा प्रयत्न केला. संबंधित पीडिता विरारच्या जीवदानी मंदिरमध्ये गेली होती. मंदिरातून परतल्यानंतर पीडितेला तिची प्रकृती बिघडली असल्याचं जाणवलं. त्यावेळी आरोपींनी तिला भूतबाधा झाल्याचं सांगितलं आणि वेळीच उपचार न झाल्यास ती कधीच आई होऊ शकणार नाही, तसेच तिच्या होणाऱ्या पतीला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो, असं सांगून तिला घाबरवलं.
हे ही वाचा: पीडितेलाच लैंगिक संबंधांची सवय... बलात्काराचे पुरावेच सापडले नाहीत, माजी आमदारांची निर्दोष सुटका
पीडितेला हॉटेलमध्ये नेलं अन्...
आरोपींनी पीडितेला एका बाबाजवळ नेण्याचं खोटं निमित्त सांगण्यात आलं. तो बाबा काही विधी करून आजार बरे करण्याचा दावा करतो, असं पीडितेला खोटं सांगून तिला बाहेर नेण्यात आलं. संबंधित आरोपी पीडितेला भूतबाधा दूर करण्याच्या बहाण्याने नालासोपाऱ्याच्या एका हॉटेलमध्ये घेऊन गेले. त्यानंतर, दोन्ही तरुणांनी तिच्यावर बलात्कार केला. मुलीने या घटनेनंतर धाडस करून पोलिसात तक्रार करण्याचा निर्णय घेतला. पीडितेने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन संबंधित आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आणि त्यांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा पीडितेने आरोप केला.
हे ही वाचा: काश्मीरमध्ये प्रचंड मोठी जीवितहानी, एका क्षणात 44 जणांचा मृत्यू; 'ती' आपत्ती आणि...
काही तासांतच आरोपी ताब्यात
पीडितेने तक्रार दाखल केल्यानंतर काही तासांतच आरोपींना अटक केल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणासंबंधी भारतीय दंड संहिता (BNS), POCSO कायदा आणि महाराष्ट्र मानवी बलिदान तसेच इतर अमानवी प्रथा, जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसई न्यायालयाने दोन्ही आरोपींना पोलिस कोठडी सुनावली असून पीडितेला न्याय मिळावा यासाठी या प्रकरणाचा जलदगतीने तपास सुरू असल्याचं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.