शरद पवार-उद्धव ठाकरेंची भेट; संजय राऊतांनी सांगितलं बैठकीत काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेबद्दल खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली.
ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मंगळवारी बैठक झाली. मुंबईतील शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी झालेल्या बैठकीला खासदार संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे हे दोन्ही नेतेही उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या चर्चेबद्दल संजय राऊत यांनी आज माहिती दिली.
संजय राऊत म्हणाले, “शरद पवारांसोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रदीर्घ आणि महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीत महाराष्ट्रातील आणि देशातील अनेक राजकीय घडामोडींवर आणि भविष्याची दिशा ठरवण्यावर चर्चा झाली. चर्चा अत्यंत सकारात्मक झाली. अनेक विषय चर्चेमध्ये होते.”
“शरद पवार हे देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. मी होतो, सुप्रिया सुळे होत्या. उद्धवजी आणि शरद पवारांमध्ये सकारात्मक चर्चा झाली”, असं राऊत यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे काँग्रेससोबत करणार चर्चा; संजय राऊतांची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर उद्धव ठाकरे आता काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. याबद्दल संजय राऊत यांनी माहिती दिली. “काँग्रेसचे के.सी. वेणूगोपाळ येत आहेत. त्यांनी उद्धवजींची वेळ मागितली आहे. पुढील दोन दिवसांत मल्लिकार्जून खरगे यांच्यावतीने वेणूगोपाळ हे मातोश्रीवर येऊन चर्चा करतील. शरद पवारांबरोबर जशी चर्चा झाली, तशी काँग्रेसच्या नेत्यांसोबत होईल. महाविकास आघाडी, राष्ट्रीय स्तरावर विरोधकांचं ऐक्य हा आमच्यासमोरचा महत्त्वाचा मुद्दा आहे”, असं संजय राऊत म्हणाले.










