'काँग्रेस एक बांडगूळ ते मित्र पक्षालाच...', BMC निवडणुकीसाठी PM मोदींचा उद्धव ठाकरेंना हळूच इशारा?
बिहार निवडणूक निकालानंतर विजयी भाषणात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना UBT पक्षाला काँग्रेसची साथ सोडण्याचा इशारा तर दिलेला नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. जाणून घ्या पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने अत्यंत घवघवीत असं यश मिळवलं आहे. त्यांच्या NDA आघाडीला 200 हून अधिक जागा मिळाल्याने त्यांचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. तर दुसरीकडे आरजेडी आणि काँग्रेससह महागठबंधनचा पार धुव्वा उडला आहे. त्यांना अवघ्या 35 जागांवरच समाधान मानावं लागलं आहे. बिहारमधील याच विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (14 नोव्हेंबर) भाजपच्या केंद्रीय मुख्यालयात येऊन जाहीर भाषण केलं. पण याच भाषणात मोदींनी काँग्रेसबाबत बोलताना त्यांच्या मित्रपक्षांना एक इशाराही दिला आहे. ज्याबाबत आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
'काँग्रेससोबत असलेल्या त्यांच्या मित्र पक्षांनी काँग्रेसपासून सावध राहावं. नाहीतर ते तुमची व्होटबँक गिळून स्वत:चं पुनरागमन करतील.' असं म्हणत पंतप्रधान मोदींनी आता इंडिया आघाडीमध्ये चलबिचल होण्यासाठी एक वेगळीच खेळी केली आहे.
निकाल बिहारचा पण PM मोदींचा उद्धव ठाकरेंना हळूच इशारा?
दरम्यान, हा इशारा उद्धव ठाकरे यांना तर नाही ना? अशी चर्चा आता दबक्या आवाजात सुरू झाली आहे. अखंड शिवसेनेची आणि भाजप ही युती अनेक वर्ष महाराष्ट्रात होती. पण महाराष्ट्रात 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी भाजपसोबतची युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत मिळून सत्ता स्थापन केली होती.
हे ही वाचा>> मोठी बातमी: आता काँग्रेस पक्षच फुटणार? खुद्द PM मोदी म्हणाले, 'लवकरच काँग्रेस पक्षात एक मोठं...'
मात्र, अडीच वर्षातच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात बंड झालं आणि पक्षात मोठी फूट पडली. यथावकाश शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह या दोन्ही गोष्टी एकनाथ शिंदेंना मिळाल्या. त्यामुळे पुन्हा शिवसेना-भाजप युती झाली. पण असं असलं तरी आता पुन्हा एकदा राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत.
2024 विधानसभा निवडणुकीत शिवसेना UBT ला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र आले आहे. त्यांच्या पक्षातील अधिकृत युती जाहीर झालेली नसली तरी आता पुढील निवडणुका ते युतीतच लढतील अशी दाट शक्यता आहे.










