दोन लोकांची कॅबिनेट म्हणजे...; अजित पवारांचं एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांच्या वर्मावर बोट

मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवारांची राज्य सरकारवर टीका, पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत देण्याची मागणी
ajit pawar On eknath shinde cabinet expansion
ajit pawar On eknath shinde cabinet expansion

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन महिना उलटून गेला, तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. आमदारांना मोठ्या प्रमाणात मंत्री करतो म्हणून सांगितलं आहे की, काय हेही कळायला मार्ग नाही, असं म्हणत अजित पवारांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे-फडणवीसांच्या सरकारवर निशाणा साधला.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मुंबईतील राष्ट्रवादी भवनात पत्रकार परिषद झाली. यावेळी अजित पवारांनी राज्यातील विविध प्रश्न उपस्थित केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अजित पवारांनी सत्कार समारंभावरून टोला लगावला.

अजित पवार काय म्हणाले?

"मधल्या काळात महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. मराठवाडा-विदर्भात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. यंत्रणेनं जशा पद्धतीनं हालचाल करणं अपेक्षित होतं, तसं होताना दिसत नाही. सुरुवातीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दौरा केला. पण त्यांनी केंद्राच्या पथकांना सांगायला हवं होतं. पण ते झालेलं नाही." असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

"अनेक गावांत पाणी शिरलं होतं. नद्यांचं पाणी गावात शिरलं. शेतांमध्ये शिरलं. पिकांची नासाडी झाली. खरीपाचा हंगाम निघून घेलेला आहे. कृषी विभागाने तातडीने हस्तक्षेप केला पाहिजे. तशा सूचना अजून खालपर्यंत गेलेल्या नाहीत. या सगळ्या बाबी घटताना तातडीची मदत मिळायला हवी होती." असंही अजित पवार म्हणाले आहेत.

"अनेकांना जीव गमवावा लागला. त्यांना मदत पोहोचली, पण आताच्या काळात ती तुटपुंजी आहे. पशुधनाची हानी झाली आहे. पशुधनाच्या नुकसानीची मदत अजूनतरी मिळालेली नाही. ती मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी पावलं उचलली पाहिजे. या संकटातून सर्वसामान्य माणसाला उभं करण्याचं आव्हान सरकारसमोर आहे. त्याकडे सरकारने तातडीने लक्ष दिलं पाहिजे."

मंत्रिमंडळ विस्तारावरून एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांना अजित पवारांचा टोला

"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊन एक महिना उलटला आहे. अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. कशामध्ये अडकलेलं आहे हे कळायला मार्ग नाही. पूर्ण बहुमत त्यांच्याकडे आहे. मग त्यांना दिल्लीतून सिग्नल मिळत नाही, का त्यांनी जास्त आमदारांना मंत्री करतो असं सांगितलं आणि संख्या वाढल्यानं आता कसा समन्वय साधायचा हा प्रश्न निर्माण झालायं."

"मंत्रिमंडळ वाढवत नाही. आज सगळ्या खात्यांचा अधिकार फक्त मुख्यमंत्र्यांकडे आहे. उपमुख्यमंत्र्यांना पण खाती दिलेली नाहीत. मी बरीच वर्ष प्रशासनात असल्यामुळे काही जणांना त्याबद्दल विचारलं. प्रत्येक फाईल मुख्यमंत्र्यांकडे जातेय. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ४२ जणांचं मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यानंतरही खूप जबाबदारी असते. त्यांच्यावर कामाचा खूप ताण असतो. आज बऱ्याचशा फाईल तुंबल्या आहेत. त्यावर सह्या करण्या करता वेळ नाहीये."

"मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात काही निर्णय तातडीने घेतले पाहिजेत. उपमुख्यमंत्र्यांना अधिकार नसल्यामुळे त्यांच्याकडे कोणती फाईल पाठवायची, नाही पाठवायची हा त्यांचा प्रश्न आहे. मला फक्त राज्य सरकारचा कारभार वेगानं होणं अपेक्षित आहे."

"मुख्यमंत्री झाल्यापासून कार्यकर्त्यांकडून सत्कार स्वीकारण्याला दुसरं प्राधान्य द्यायला हवं होतं. प्रथम प्राधान्य त्यांनी पूरग्रस्तांचे आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी दिलं पाहिजे. राज्यातील शेतकरी अडचणी असताना त्यांना मदत पोहोचवण्याऐवजी मुख्यमंत्री गावोगावी सत्कार स्वीकारत आहेत. हे संवेदनशून्यतेचं लक्षण आहे."

मुख्यमंत्रीच नियम मोडत असतील, तर...; अजित पवार एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमाबद्दल काय म्हणाले?

"मुख्यमंत्र्यांनी कोणते कार्यक्रम घ्यावेत हा त्यांचा अधिकार आहे. पण ठाणे, नाशिक, औरंगाबादमध्ये दौरे बघा, ते सत्कार स्वीकारत आहेत. खरंतर मुख्यमंत्री असो की उपमुख्यमंत्री असो, कुणीही असलात तरी रात्री दहा वाजता माईक बंद करायचा असतो. सर्वांनी नियम पाळायचे असतात. आता राज्याचे मुख्यमंत्रीच जर नियम मोडत असतील तर तिथल्या पोलीस आयुक्तांनी काय करायचं. पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना आदेश देणारेच नियम मोडायला लागले. घटना पायदळी तुडवायला लागले, तर हे बरोबर नाही. मुख्यमंत्र्यांनी याला आवर घातला पाहिजे. त्यांच्या उत्साही कार्यकर्त्यांना सांगितलं पाहिजे."

"मुख्यमंत्री सध्या मान्यवरांचं दर्शन घेताहेत. भेटी घेत आहेत. मुख्यमंत्री १३ कोटी जनतेचं नेतृत्व करतात. पूरग्रस्तांना मदत करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. जिथे अतिवृष्टी झाली आहे, तिथे ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे."

दोन जणांच्या मंत्रिमंडळावरून शिंदे-फडणवीसांना अजित पवारांनी काढला चिमटा

"महागाई प्रचंड वाढली आहे. भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत. त्याबद्दल सरकार काय पावलं उचलणार? काय निर्णय घेणार, हे सांगायला कुणी नाही. मी आजच मुख्यमंत्र्यांना पत्र देणार होतो. बुधवारी मंत्रिमंडळ बैठक असते. दोन लोकांची कॅबिनेट म्हणजे किती महत्त्वाची कॅबिनेट आहे. ती उद्या असेलच. उद्या मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहे."

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in