
बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार स्थापन झाले आहे, परंतु हे सरकार स्थापनेपूर्वी राजदला कोणताही धोका पत्करायचा नव्हता, म्हणून महागठबंधनमधील सर्व आमदारांना ९ ऑगस्टला सकाळी राबरी निवासस्थानी बोलावले होते. बैठक कशासाठी आहे हे सांगण्यात आले नव्हते. सर्वांना ७ ऑगस्टलाच राबरी निवासस्थानी येण्यास सांगितले होते.
आरजेडीचे आमदार इस्रायल मन्सूरी यांनी सांगितल्यानुसार, आमदार राबरी निवासस्थानी पोहोचले तेव्हा सर्वांना आपल्या गाडीतच मोबाइल फोन ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यानंतर ते आतमध्ये पोहोचले असता त्यांची पाठिंब्याच्या पत्रावर प्रथम सही घेण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, ९ ऑगस्ट रोजी सर्व आमदार सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत राबरी निवासस्थानी होते. या बैठकीला केवळ राजदच नाही तर काँग्रेस आणि इतर महाआघाडीचे आमदारही उपस्थित होते. चार वाजता राज्यपाल फागू चौहान यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर नितीश कुमार राबडी देवींच्या निवासस्थानी पोहोचले तेव्हा तेजस्वी यांच्यासह सर्व आमदार तेथे उपस्थित होते.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या वक्तव्यावर भाजप आमदार आणि माजी मंत्री राम सुरत राय यांनी प्रत्युत्तर दिले. 2024 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील पण 2025 मध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत. त्यांनी आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली तरी ते नवव्यांदा मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत असे राम सुरत राय म्हणाले आहेत.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव न घेता म्हटले होते- 'जे २०१४ मध्ये निवडूण आले आहेत, ते २०२४ पर्यंत पुढे राहू शकतील असे नाही...' त्यांचे हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे कारण ते सहसा अशा प्रतिक्रिया देत नाहीत.
दुसरीकडे, तेजस्वी यादव यांच्या वक्तव्यावर ते म्हणाले की, चंदनचा टीका लावणारे लोक कधीच खोटं बोलत नाहीत, पण तेजस्वी गोल टोपी घालून जनतेला गोल-गोल घूमवत आहेत. तेजस्वी यादव यांनी गिरीराज सिंह यांच्यावर हल्ला करताना ट्विटरवर लिहिले की, 'एक फूट लांब शेंडी असण्याने कोणी माणूस शहाणा होत नाही, जशी तुम्ही ठेवता. तुमच्या अशा कृत्यांमुळेच भाजपची ही अवस्था झाली आहे.
राजीनामा दिल्यानंतर भाजपवर हल्लाबोल करताना नितीशकुमार म्हणाले होते की, भाजपने आम्हाला संपवण्याचा कट रचला होता. भाजपने नेहमीच अपमानित केले आहे. आपण भाजपपासून वेगळे व्हावे हीच सर्वांची इच्छा असल्याचे ते म्हणाले. आमदार-खासदारांच्या सहमतीनंतर युती तोडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले होते.
१० ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली. यामध्ये २४ ऑगस्ट रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यपालांची मंजुरी मिळाल्यानंतर २४ ऑगस्ट रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात नितीश कुमार त्यांच्या सरकारला बहुमत सिद्ध करायचे आहे.