
सिल्व्हर ओक बाहेरील हिंसक आंदोलनामुळे चर्चेत आलेले आणि सध्या सातारा पोलिसांच्या कोठडीत असलेले गुणरत्न सदावर्ते यांच्यासमोरील अडचणी वाढत आहेत. सदावर्ते यांच्याविरुद्ध बीडमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाबद्दल केलेल्या वक्तव्या प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात नोंदवल्या गेलेल्या गुन्ह्यांची यादी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानाबाहेर झालेल्या हिंसक आंदोलन प्रकरणामुळे अडचणीत असतानाच सदावर्तेंविरुद्ध सातारा, अकोल्या आणि आता बीडमध्येही गुन्हा दाखल झाला आहे.
भाजपचे बीड तालुकाध्यक्ष ॲड.स्वप्नील गलधर यांच्याकडून सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाविषयी तसेच मराठा समाज बांधवांच्या मोर्चाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणात बीडमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवला गेला आहे.
'मराठा आरक्षण हे मोगलाई पद्धतीने लुटले जाऊ शकत नाही. पाटीलकी, देशमुखी, राजेशाहीचे राज्य नाही. महागड्या गाड्या आणून लोक जमवले व ५२ मोर्चे काढले. मुख्यमंत्र्यांना वेठीस धरुन आरक्षण मिळत नाही. अखेर सर्वोच्च न्यायालयाने अँटी व्हायरस देऊन आरक्षण नेस्तनाबूत केलं,' असं वक्तव्य सदावर्ते यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केलेलं होतं.
त्यांच्या याच विधानावर आक्षेप घेत तक्रार देण्यात आली होती. त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय त्यांनी महापुरूषांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचाही आरोप त्यांच्यावर तक्रारीत करण्यात आलेला आहे.
याआधीही अकोला आणि साताऱ्यात त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला गेले आहे. अकोल्यात गुणरत्न सदावर्ते, जयश्री पाटील यांच्यासह चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
एसटी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष विजय मालोकार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. विशेष म्हणजे मालोकार यांनी जानेवारीमध्ये या प्रकरणी तक्रार दिली होती. अजयकुमार बहाद्दरसिंग गुजर आणि गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयातून विलीनीकरणाचा मुद्दा सोडवून देतो म्हणून कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतले. प्रत्येकी ३०० ते ५०० रुपये जमा केले. जवळपास ७० हजार कर्मचाऱ्यांकडून तीन कोटी रुपये जमवल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.
सदावर्ते यांच्याविरुद्ध साताऱ्यातही मराठा आरक्षणाबद्दल बोलताना सदावर्तेंनी बेताल वक्तव्य केल्याची तक्रार देण्यात आली होती. त्याप्रकरणात सदावर्तेंविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. सातारा पोलिसांनी अटक केल्यानंतर सदावर्तेंना न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे.
सिल्व्हर ओक हिंसक आंदोलन प्रकरणात न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर सातारा पोलिसांनी सदावर्तेंना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आता ते पोलीस कोठडीत असून, बीड पोलीस काय कारवाई करणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.