महाविकास आघाडीला झटका : राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारबाहेर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एकीकडे केंद्रीय तपासयंत्रणांचा ससेमिरा चालू असताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारसमोर आता नवी समस्या निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीतला पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आता सरकारची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात पक्ष कार्यकारणीच्या बैठकीत याची घोषणा केली.

गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्याच्या हिताचा एकही निर्णय घेतलेला नाही, म्हणूनच स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या सरकारमधून बाहेर पडत असल्याचं शेट्टींनी जाहीर केलं. हातकणंगले येथील चोकाक येथे पक्ष कार्यकराणीच्या बैठकीत शेट्टींनी आपला निर्णय जाहीर केला. ज्याला उपस्थित कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी जोरदार प्रतिसाद दिला. यावेळी राजू शेट्टींनी केंद्र सरकारवरही शेतकरी विरोधी धोरण अवलंबल्याचं म्हणत टीका केली.

गेल्या काही दिवसांपासून राजू शेट्टी हे महाविकास आघाडी सरकारवर नाराज असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. उस शेतकऱ्यांसाठी एकरकमी एफआरपी, शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी राजू शेट्टींनी थेट राज्य सरकारला धारेवर धरलं होतं. राज्य सरकारने राजू शेट्टी यांची नाराजी दरम्यानच्या काळात दूर करण्याचे प्रयत्न केले. परंतू शेट्टींनी तोपर्यंत सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय पक्का केला होता. त्या निर्णयावर आज पक्ष कार्यकारणीच्या बैठकीत शिक्कामोर्तब केलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शेतकरी हितासाठी आपण कोणतीही राजकीय तडजोड करणार नाही, असं सांगत शेट्टी यांनी राज्यपालनियुक्त आमदारकीच्या १२ उमेदवारांच्या यादीतून आपलं नाव वगळावं अशी राज्यपालांना विनंती करणार असून त्यासाठी त्यांच्या भेटीची वेळ मागितली आहे असं सांगितलं. दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शेट्टी यांची नाराजी आपण दूर करू, असं स्पष्ट केलं होतं. परंतू आजच्या निर्णयामुळे राजू शेट्टी महाविकास आघाडीवर नाराज असल्याचं दिसून आलं. तसेच केंद्र सरकारनं ही शेतकरी हिताच्या विरोधात भूमिका घेतल्याचा आरोप शेट्टी यांनी केलाय. त्यामुळे भविष्यात राजू शेट्टी कोणती राजकीय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT