
देशभरात जन्माष्टमी आणि दहीहंडीनिमित्त जल्लोषाचं वातावरण असतानाच दिल्लीत सीबीआयने टाकलेल्या धाडीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरासह विविध मालमत्तांवर धाडी टाकल्या. उपराज्यपाल विनय सक्सेना यांनी सीबीआय तपासाची शिफारस करण्यात आल्यानंतर हे धाडसत्र सुरू झालंय. दिल्ली मद्यविक्री धोरणासंदर्भात (Delhi Liquor Policy) ही कारवाई केली जातेय.
उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्याकडे उत्पादन शुल्क विभागही आहे. याच विभागासंदर्भातील निर्णयावरून ते सीबीआयच्या रडारवर आले आहेत. उपराज्यपाल विनय सक्सेना यांनी मुख्य सचिवांनी रिपोर्ट सादर केल्यानंतर सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर आता सीबीआय सक्रिय झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सीबीआयची पथकं मनिष सिसोदिया, दिल्लीचे उत्पादन शुल्क आयुक्त अरावा गोपी कृष्णना यांच्या निवासस्थानासह २१ ठिकाणी पोहोचली आहेत. दिल्लीसह ७ राज्यांमध्ये सीबीआयची ही कारवाई सुरू आहे.
मनिष सिसोदिया यांच्याविरुद्ध सीबीआयची जी कारवाई सुरू झालीये, ती उत्पादन शुल्क विभागाच्या नव्या धोरणामुळे. मनिष सिसोदिया यांनी नव्या धोरणाच्या आडून मद्य परवानाधारकांना फायदा मिळवून दिल्याचा आरोप करण्यात आलाय. परवाने देताना नियमांकडे कानाडोळा करण्यात आला. निविदा निघाल्यानंतर मद्य कंत्राटदारांचे १४४ कोटी रुपये माफ करण्यात आले, असं आरोप मनिष सिसोदिया यांच्यावर आहे.
कोरोनाचं निमित्त करून परवाना शुल्क माफ करण्यात आलं आणि मद्यविक्रेत्यांना त्यांचा फायदा झाला. नव्या अबकारी धोरणामुळे राज्याच्या महसुलाला मोठा फटका बसला आहे आणि मद्यविक्रेत्यांना फायदा होण्यासाठीच नवीन मद्यधोरण आणण्यात आलं असल्याचा ठपका रिपोर्टमध्ये ठेवण्यात आलाय. याच रिपोर्टच्या आधारे उपराज्यपालांनी सीबीआय चौकशीची शिफारस केलीये.
मनिष सिसोदिया यांनी ट्विट करून सीबीआय कारवाईची माहिती दिली. "सीबीआय आलीये. त्यांचं स्वागत आहे. आम्ही प्रामाणिक आहोत. लाखो मुलांचं भविष्य घडवत आहोत. हे अत्यंत दुर्दैवी आहे की, आपल्या देशात जो चांगलं काम करतो, त्याला अशा पद्धतीने त्रास दिला जातो. त्यामुळेच आपला देश अजूनपर्यंत पहिल्या क्रमांकावर गेला नाहीये."
"तपासात पूर्ण सहकार्य करणार आहे, जेणेकरून सत्य लवकर समोर यावं. आतापर्यंत माझ्यावर अनेक गुन्हे दाखल केले, पण काहीच हाती लागलं नाही. यातही काहीच हाती लागणार नाही. देशात चांगलं शिक्षण मिळावं म्हणून सुरू असलेलं माझं काम रोखू शकत नाही", असं सिसोदिया यांनी म्हटलंय.
"दिल्लीतील शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सुरू असलेलं चांगलं काम बघून हे त्रस्त आहेत. त्यामुळेच दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन आणि शिक्षणमंत्र्यांना पकडलं आहे, जेणेकरून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील काम थांबवता येईल. आम्हा दोघांवरही खोटे आरोप केले जात आहेत. न्यायालयात सत्य समोर येईल", असं मनिष सिसोदिया यांनी म्हटलंय.