
देशात कोळसा टंचाईचं संकट गडद होताना दिसत असून, सण-उत्सवाच्या काळात महाराष्ट्र अंधारात जाण्याची शक्यता आहे. कारण चिंतेत भर टाकणारी माहिती चंद्रपूर येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून येत आहे. वीज निर्मिती केंद्रात फक्त दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक असून, कोळसा कधी येणार याकडे नजरा लागल्या आहेत.
कोळसा टंचाईमुळे आता लोडशेडिंग आणि परिणामी अंधारात राहावं लागण्याची भीती गडद होताना दिसत आहे. केंद्राकडून पुरेसा कोळसा असल्याचं सांगितलं जात असलं, तरी देशभरातील विविध राज्यांनी कोळशाचा तुटवडा निर्माण होत असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यातच आता महाराष्ट्रातील महत्त्वाच्या वीज निर्मिती प्रकल्पांपैकी असलेल्या चंद्रपूर औष्णिक वीज निर्मिती केंद्रावर कोळसा टंचाईचं संकट ओढवण्याची शक्यता आहे.
चंद्रपूर वीज निर्मिती केंद्रात दोन दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा शिल्लक असून, लवकरात लवकर कोळशाचा पुरवठा केला जाईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. वीज निर्मिती केंद्रातील दोन युनिट बंद करण्यात आले आहेत. 2920 मेगावॅट वीज निर्मिती करण्याची क्षमता असलेल्या या केंद्रात सध्या फक्त 1400 मेगावॅट वीज निर्मिती होत आहे.
सध्या चंद्रपूर वीज निर्मिती केंद्राला वेस्टर्न कोल फील्ड लिमिटेडकडून कोळशाचा पुरवठा केला जात आहे. वीज निर्मिती प्रकल्पात सध्या दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा राहिला असून, कोळशाचा पुरवठा केला जाईल, अशी आशा आता वीज निर्मिती केंद्राच्या व्यवस्थापनानं व्यक्त केली आहे.
कोळशाच्या टंचाई आणि अपुऱ्या प्रमाणात होत असलेल्या पुरवठ्यामुळे महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच बंद पडले आहेत. त्यामुळे तब्बल 3330 मेगावॅट वीज निर्मिती थांबली आहे. विजेची ही तूट भरून काढण्यासाठी तातडीच्या वीजखरेदीसह जलविद्युत व अन्य स्त्रोतांकडून वीजपुरवठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
कोळसा टंचाईमुळे राज्यात विजेचं भारनियमन सुरू होण्याची दाट शक्यता असून, हे टाळण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांनी विजेची मागणी व वीज निर्मिती यामधील संतुलन राखण्यासाठी सकाळी ६ ते १० व सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत विजेचा वापर काटकसरीने करावा, असं आवाहन महावितरणकडून केलं जात आहे.