कल्याणच्या आधारवाडी तुरुंगात पुन्हा कोरोनाचा शिरकाव, 40 कैद्यांसह कर्माचारी पॉझिटिव्ह

कल्याणच्या आधारवाडी तुरुंगात पुन्हा कोरोनाचा शिरकाव, 40 कैद्यांसह कर्माचारी पॉझिटिव्ह

मिथिलेश गुप्ता, प्रतिनिधी, कल्याण

कल्याणच्या आधारवाडी तुरुंगात पुन्हा कोरोनाने शिरकाव केला असून जेल मधील 40 कैद्यांसह काही जेल कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आधारवाडी जेलमध्ये सध्या 1500 पेक्षा जास्त कैदी असून यापैकी 40 कैद्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. या सर्व कैद्यांची तब्येत सध्या ठीक असून त्यांना उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत असल्याची माहिती जेल अधीक्षक अंकुश सदाफुले यांनी दिली.

कल्याणमध्ये आणि ठाणे जिल्ह्यात कोरोना रूग्ण संख्येत वाढ झाली आहे. कोरोना संख्येच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी आधारवाडी जेलमधील कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी 40 कैद्यांसह कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या सर्व कैद्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले असून कारागृहातील सर्वच कैद्यांचे कोवीड लसीकरण पूर्ण झाले आहे. तर कालपासून बूस्टर डोस देण्याचे सुरु असतानाच हा प्रकार समोर आला असून कोवीड रुग्ण आढळल्यानंतर जेलमध्ये सॅनिटायझेशन करण्यात आले असून उर्वरित सर्व कैद्यांना पोषक आहार देण्यात येत आहे. एखाद्या कैद्याला थंडी-ताप आल्यास जेलमध्ये विलगीकरण कक्षही बनवण्यात आला असून कोरोनाची लक्षणे असणाऱ्या कैद्यांना तात्पुरत्या स्वरूपात याठिकाणी ठेवण्यात येते. तसेच डॉन बोस्को शाळेमध्येही विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला असून नवीन कैद्यांना त्याठिकाणी ठेवले जात असल्याची माहिती जेल अधीक्षक अंकुश सदाफुले यांनी दिली.

कोरोना रूग्णसंख्या
कोरोना रूग्णसंख्या प्रातिनिधिक फोटो

मुंबईत 11 हजार 647 नवे रूग्ण

मुंबईत 11 हजार 647 नवे रूग्ण आढळले आहेत. मुंबईचा टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट 19 टक्के झाला आहे. मुंबईत दिवसभरात दोन मृत्यूंची नोंद झाली आहे. मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट 23 टक्के होता, तो 21 टक्के झाला आणि त्यानंतर 19 टक्के झाला. मुंबईतली रूग्णसंख्या स्थिरावते आहे असं चित्र आहे. मुंबईत आज 851 रूग्णांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं.

आज 14980 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत 8 लाख 20 हजार 313 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आज दिवसभरात दोन मृत्यूंची नोंद झाली आहे. तर आत्तापर्यंत एकूण 16 हजार 413 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 62 हजार 97 चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 87 टक्के इतका झाला आहे. तर डबलिंग रेट 36 दिवसांवर गेला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in