नवीन वर्षात कोरोना विषाणूची लस बाजारात आल्यानंतर संपूर्ण देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. भारतीय कंपन्यांनी बनवलेली लस टप्प्या-टप्प्यात सर्वांना देण्यात येतेय. या लसीच्या स्टोअरेजसाठी शहरांपासून ते ग्रामीण पातळीवर वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु अकोल्यात दुसऱ्या टप्प्याचं लसीकरण सुरु असताना करोनाच्या सात लसी गहाळ झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पातुर तालुक्यातील चतारी ग्रामीण रुग्णालयात हा धक्कादायक प्रसंग घडला आहे.
आरोग्य विभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून याची चौकशी करण्यासाठी समितीची नेमणूक केली आहे. पोलीस स्टेशनमध्ये याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीय याचा तपास करत आहेत.
अकोला जिल्ह्यातील चतारी ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी ४५० डोस मिळाले होते. १२ फेब्रुवारीला झालेल्या लसीकरणानंतर ४५० पैकी ४४ लसीचे डोस उरणं गरजेचं होतं. यावेळी रुगणालयातील नर्सनी उरलेल्या स्टॉकची तपासणी केली असता ७ लसीचे डोस कमी असल्याचं दिसून आलं. हा प्रकार लक्षात आल्यानंतर स्थानिक परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी याप्रकरणाची चौकशी करुन पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान याप्रकरणी लसीचे डोस गहाळ झाले की त्यांची चोरी झाली हे तपासाअंती स्पष्ट होईल. घडलेला प्रकार गंभीर असून याची चौकशी करण्यासाठी आम्ही समितीची स्थापना केली असून अहवाल हातात आल्यानंतर यासाठी जबाबदार असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कारवाई केली जाईल अशी माहिती सिव्हील सर्जन राजकुमार चव्हाण यांनी मुंबई तक शी बोलताना दिली.